Ashish Shelar : मुंबईत पहाटेपासून मुसळधार पाऊस, सखल भागांत पाणी साचले; पालकमंत्री आशिष शेलार यांचे शाळांना निर्देश

• दादर, सायन, कुर्ला येथे गुडघाभर पाणी; नागरिकांना घरातच थांबण्याचे आवाहन
मुंबई :- शहरात आज पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. पावसाचा जोर पाहता मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पालकमंत्री आशिष शेलार यांनी मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सकाळच्या सत्रातील मुलांना सुरक्षितपणे घरी सोडण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत.
मुंबईची लाईफलाईन पाण्याखाली
दक्षिण मुंबईसह उपनगरांमध्ये पाऊस विनाखंड कोसळत आहे. आज सकाळी सूर्याचे दर्शन झालेच नाही. किंग्ज सर्कल, सायन, हिंदमाता, कुर्ला, अंधेरी आणि परळ यांसारख्या सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचल्यामुळे नागरिकांना मोठी अडचण होत आहे. पश्चिम उपनगरात अंधेरी पश्चिम परिसरात जे.पी. रोड, मिलन सबवे आणि एल.बी.एस. मार्गावर पाणी साचल्याने प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.
प्रशासनाकडून तातडीची पावले
या गंभीर परिस्थितीमुळे महानगरपालिका यंत्रणा सतर्क झाली असून, सखल भागांमधील पाण्याचा उपसा पंपांच्या साहाय्याने सुरू करण्यात आला आहे. नागरिकांनी गरज नसल्यास घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच, पाण्याचा साठा झाल्याची कोणतीही घटना घडल्यास आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. मंत्रालयाकडून फ्री वेच्या दिशेने जाणारी वाहतूकही मंदावली आहे. पुढील काही तास पावसाचा जोर असाच कायम राहण्याची शक्यता आहे.


