
Ashish Shelar On Thackeray Brothers : भेंडी बाजार आणि बेहराम पाड्यावरून ‘दोघां’मध्ये पेच? शेलारांनी उडवली युतीची थट्टा
मुंबई :- मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार असून, जागावाटपाचे राजकारण आता शिगेला पोहोचले आहे. अशातच भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ आणि राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ या दोन निवासस्थानांमधील सुरू असलेल्या गुप्त चर्चेवर जोरदार टीका केली आहे. “मातोश्रीचे शिपाई तिळगुळ घेऊन शिवतीर्थावर जात आहेत, पण प्रत्यक्षात मात्र दोघांमध्ये मोठी दरी आहे,” असा टोला शेलार यांनी लगावला.
“तिळाएवढ्या जागा आणि गुळ खिशातच”
आगामी निवडणुकीला मकर संक्रांतीच्या मुहूर्ताचा संदर्भ देत शेलार म्हणाले की, “उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंना तिळाएवढ्या (अल्प) जागा देऊन ‘गुळ’ (मुख्य सत्ता) स्वतःच्या खिशातच ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. गोड गोड बोलून आपल्या ‘लाडक्या’ भावाला भुरळ घातली जात आहे. ज्या जागांवर पडण्याची शाश्वती आहे, अशाच जागांची ‘खिरापत’ राज ठाकरेंच्या मनसेला वाटली जात आहे.”
भेंडी बाजार आणि मालवणीवर अडलंय घोडं?
जागावाटपाच्या सूत्रावर भाष्य करताना शेलारांनी दावा केला की, अनेक मराठी बहुल जागांचे वाटप झाल्याचे सांगितले जात असले तरी खरा पेच वेगळीकडेच आहे. “भेंडी बाजार, मोहम्मद अली रोड, मालवणी आणि बेहराम पाडा या मुस्लिम बहुल भागांवरून दोघांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. दोघांनाही इथेच समान जागा हव्यात आणि याच भागांवरून चर्चेचे सूत्र अडकले आहे. मीडियाला काही समजू नये म्हणून हे सर्व झाकून ठेवले जात आहे,” असा खळबळजनक गौप्यस्फोट शेलार यांनी केला.
आशिष शेलार यांचे ठाकरे बंधूंवर टीका
मातोश्रीचे शिपाई तिळगुळ घेऊन शिवतीर्थावर जातात. ‘तिळा’ एवढ्या जागा देऊन ‘गुळ’ खिशातच ठेवतात. गोड गोड बोलून “लाडक्या”भावाला भुरळ घातली जातेय. पडणाऱ्या जागांची मोठी खिरापत वाटली जातेय. बाकी सगळ्या जागांचे वाटप म्हणे झालंय. भेंडी बाजार, मोहम्मद अली रोड, मालवणी,बेहराम पाडा यावर सगळं अडलंय. दोघांनाही इथेच समान जागा हव्यात? दोघांमध्ये यावरच चर्चेची सुरु आहेत सूत्रं? मीडियाला कळू नये म्हणून झाकून ठेवलेत सूत्रं.


