Ashish Jaiswal Car Accident : शिवसेनेचे आमदार आशिष जयस्वाल यांच्या कारचा भीषण अपघात
•रामटेक विधानसभा मतदारसंघातील शिंदे गटाचे आमदार ॲड. आशिष जयस्वाल यांच्या कारचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू
नागपूर :- रामटेक विधानसभा मतदारसंघातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार ॲड. आशिष जयस्वाल यांच्या ताफ्याला नागपूर पासून 21 किलोमीटर दूर अंतरावर असलेला कन्हान परिसरात भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये आमदार आशिष जयस्वाल यांच्या पीए समावेत त्यांच्या ताफ्यातील दोघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र, यामध्ये आशिष जयस्वाल हे सुखरूप बचावले आहेत. अपघात झालेल्या गाडीमध्ये ते उपस्थित नव्हते अशी माहिती समोर आली आहे.
राज्यामध्ये सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यातील पहिला टप्प्यातच रामटेक लोकसभा मतदारसंघात निवडणूक होत आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या वतीने राजू पारवे हे रिंगणात आहेत. त्यांच्या प्रचारासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा देखील आयोजित करण्यात आली आहे. मात्र, या सर्व पार्श्वभूमीवर रामटेक विधानसभा मतदारसंघातील आमदार आशिष जयस्वाल यांच्या ताफ्यातील गाडीच्या अपघाताचे वृत्त समोर आले आहे. या घटनेत दोघांचा मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर आशिष जयस्वाल शिंदेंसोबत
आशिष जयस्वाल हे रामटेक विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून आले आहेत. या आधी देखील ते शिवसेनेच्या वतीने रामटेक विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत महायुतीमध्ये जाण्याचा निर्णय आमदार आशिष जयस्वाल यांनी घेतला होता. त्यामुळे सध्या ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या प्रचारात व्यस्त आहेत.