Asavari Jagdale : “सरकारचे आश्वासन हवेतच; शहीद पित्याच्या कन्येची नोकरीसाठी पायपीट”; आसावरी जगदाळे यांची व्यथा

•मंत्रालयातून अद्याप मंजुरी नाही; मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट मिळेना; खासदार मेधा कुलकर्णी यांची अमित शहांकडे धाव
पुणे | गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील संतोष जगदाळे यांना वीरमरण आले होते. या घटनेनंतर राज्य सरकारने जगदाळे कुटुंबाला सांत्वन देत आसावरी जगदाळे यांना शासकीय नोकरीत सामावून घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आज दहा महिने उलटूनही हे आश्वासन पूर्ण झालेले नाही.
प्रस्ताव मंत्रालयात धूळ खात
आसावरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे महानगरपालिकेने त्यांना नोकरीत घेण्याबाबतचा प्रस्ताव गेल्या वर्षी जुलै महिन्यातच मंत्रालयात पाठवला होता. मात्र, मंत्रालयातील लाल फितीच्या कारभारात हा प्रस्ताव अद्यापही मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. “आम्ही सध्या आर्थिक अडचणीत आहोत. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले होते, पण आता मंत्रालयातून दाद मिळत नाही,” असे आसावरी यांनी ‘वृत्तवाहिनीची’शी बोलताना सांगितले.
भेट घेण्याचे प्रयत्न निष्फळ
आपल्या मागणीसाठी आसावरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याचे अनेकदा प्रयत्न केले. मात्र, दुर्दैवाने त्यांची भेट होऊ शकली नाही. इतकेच नव्हे तर पंतप्रधान कार्यालयाशी (PMO) संपर्क साधूनही सरकारकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचे त्यांनी खेदाने नमूद केले.
उच्चशिक्षित असूनही प्रतीक्षा
आसावरी जगदाळे या उच्चशिक्षित आहेत. त्यांनी संगणकशास्त्रात बी.एस्सी. आणि मानव संसाधन व्यवस्थापनात (HR) एमबीए पदवी पूर्ण केली आहे. त्यांच्याकडे खाजगी क्षेत्रातील कामाचा अनुभवही आहे. सरकारने त्यांना सामान्य प्रशासन विभागात ‘वर्ग-2’ चे प्रशासकीय अधिकारी पद देण्याचे आश्वासन दिले होते, जे अद्याप कागदावरच आहे.
खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुढाकार
या प्रकरणाची दखल घेत राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. जगदाळे कुटुंबाला न्याय देऊन आसावरी यांना तातडीने शासकीय सेवेत रुजू करून घेण्याची विनंती त्यांनी केली आहे.



