महाराष्ट्र
Trending

Asaduddin Owaisi : लोकसंख्येवरून ‘राणा विरुद्ध ओवैसी’ जुंपली! “मी ६ मुलं जन्माला घातली, तुम्हाला कोणी रोखलंय?”; ओवैसींचा नवनीत राणांना टोला

Asaduddin Owaisi on Navneet Rana : हिंदूंनी 4 मुलं जन्माला घालावीत या राणांच्या विधानावर ओवैसींचा प्रतिहल्ला; चंद्रबाबू नायडूंच्या वक्तव्याचाही दिला संदर्भ

अकोला/अमरावती | लोकसंख्या नियंत्रण की वाढ, या विषयावरून दोन टोकाच्या भूमिका समोर येत आहेत. अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी मुस्लीम समाजातील वाढत्या लोकसंख्येचा दाखला देत हिंदूंनी मुलांची संख्या वाढवावी, असे आवाहन केले होते. याला अकोल्यात बोलताना असदुद्दीन ओवैसी यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिले आहे.

नवनीत राणांचे नेमके विधान काय?

नवनीत राणा यांनी मौलाना सय्यद कादरी यांच्या विधानाचा संदर्भ देत म्हटले होते की, “काही लोकांचा उद्देश हिंदुस्थानला पाकिस्तान बनवण्याचा आहे. ते मोठ्या संख्येने मुले जन्माला घालत आहेत. अशा परिस्थितीत हिंदूंनी केवळ एका मुलावर संतुष्ट का राहावे? लोकसंख्येचे संतुलन राखण्यासाठी हिंदूंनी किमान ४ मुलं जन्माला घातली पाहिजेत.”

ओवैसींचा पलटवार: “तुम्हीही जन्माला घाला”

नवनीत राणांच्या या विधानावर प्रतिक्रिया देताना ओवैसी म्हणाले, “तुम्हाला कोणी रोखलं आहे का? तुम्हीही 4 मुलं जन्माला घाला. मी तर 6 मुलं जन्माला घातली आहेत. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू सुद्धा आता तीनपेक्षा जास्त मुलं जन्माला घाला असं म्हणत आहेत. मग तुम्हाला अडचण काय आहे?” ओवैसींच्या या विधानामुळे आता या वादात अधिकच तेल ओतले गेले आहे.

‘लव्ह जिहाद’ आणि वैयक्तिक अधिकारांवर भाष्य

अमरावतीत झालेल्या पत्रकार परिषदेत ओवैसींनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या ‘लव्ह जिहाद’ संदर्भातील विधानावरही भाष्य केले. “जर खरोखरच लव्ह जिहाद घडत असेल, तर सरकार संसदेत त्याचा अधिकृत डेटा का देत नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, एखादी 18 किंवा 21 वर्षांची प्रौढ व्यक्ती स्वतःचे निर्णय घेत असेल, तर तो कायद्याने दिलेला अधिकार आहे, त्यात कोणाची पसंती-नापसंती महत्त्वाची नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

चंद्रबाबू नायडूंची भूमिका काय?

विशेष म्हणजे, लोकसंख्येच्या मुद्द्यावर एनडीएचे घटक पक्ष असलेल्या चंद्राबाबू नायडू यांनीही वेगळी भूमिका मांडली आहे. “भारताला महासत्ता बनायचे असेल तर लोकसंख्या, ज्ञान आणि कौशल्य यांची सांगड घालावी लागेल. लोकसंख्येचे संतुलन राखण्यासाठी प्रत्येक जोडप्याने किमान तीन अपत्ये जन्माला घालावीत,” असे आवाहन नायडू यांनी केले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0