क्राईम न्यूज

Arroli Khadi Suicide News : ऐरोली खाडी पुलावर आत्महत्या करण्याचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवला 20 वर्षीय तरुणीचा जीव

Navi Mumbai Latest Suicide News : रिक्षाचालकाच्या सतर्कतेमुळे वेळीच मिळाली माहिती, पोलिसांचे प्रसंगावधान मोलाचे ठरले

नवी मुंबई :- ऐरोली खाडी पुलावर आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका 20 वर्षीय तरुणीचा जीव पोलिसांनी वाचवला आहे. मंगळवारी मध्यरात्री घडलेल्या या घटनेत विक्रोळी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक नितीन खंदारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवत या तरुणीला आत्महत्येपासून परावृत्त केले. एका रिक्षाचालकाच्या सतर्कतेमुळे पोलिसांना ही माहिती वेळीच मिळाली आणि एक मोठा अनर्थ टळला. Navi Mumbai News

मंगळवार, 16 सप्टेंबर रोजी मध्यरात्री 12.30 च्या सुमारास उपनिरीक्षक नितीन खंदारे ऐरोली चेक नाका येथे गस्त घालत होते. त्याचवेळी रिक्षाचालक दामोदर रविदास धावत त्यांच्याकडे आला आणि ऐरोली खाडी पुलावर एक मुलगी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती दिली.

माहिती मिळताच, खंदारे यांनी तात्काळ पोलीस हवालदार पाटील (घाटकोपर पोलीस ठाणे), सहारे (नवघर पोलीस ठाणे) आणि पाटील (पंतनगर पोलीस ठाणे) यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना पाहताच ती तरुणी पुलाच्या कठड्यावर (रेलिंग) चढण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, पोलिसांनी समयसूचकता दाखवत तिला पकडून खाली आणले आणि तिच्याशी संवाद साधला.

या तरुणीने पोलिसांना सांगितले की, ती नवी मुंबईच्या ऐरोली परिसरात राहते. तिचे वडील सोबत राहत नाहीत आणि घरगुती समस्यांमुळे ती नैराश्यात होती. वाढलेल्या मानसिक तणावामुळे तिने आत्महत्येचा विचार केला होता. पोलिसांनी तिच्याशी बोलून तिला धीर दिला आणि तिचे समुपदेशन केले.

पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे आणि रिक्षाचालकाच्या समयसूचकतेमुळे एका तरुणीचा जीव वाचला आहे. पोलीस उपनिरीक्षक नितीन खंदारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

vivek

Recent Posts