Archana Patil in Ajit Pawar Gat : राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून अर्चना पाटील यांना धाराशिव मधून लोकसभेचे उमेदवारी जाहीर
•भाजपाचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांची पत्नी अर्चना पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश केला असून त्यांना धाराशिवची उमेदवारी निश्चित करण्यात आली
मुंबई :- भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय. अर्चना पाटील यांचा आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर उपस्थित होत्या. अर्चना पाटील यांच्या पक्षप्रवेशानंतर त्यांना धाराशिव लोकसभा मतदारसंघातून महायुतीची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. सुनील तटकरे यांनी आज पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबाबतची घोषणा केली. धाराशिवमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता धाराशिवमध्ये ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर विरुद्ध अर्चना पाटील अशी लढत बघायला मिळणार आहे.
अर्चना पाटील कोण आहेत? त्यांची राजकीय कारकीर्द
अर्चना पाटील या धाराशिव जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा आहेत. लेडीज क्लब या धाराशिव जिल्हा आणि परिसरातील महिलांसाठी काम करणाऱ्या संघटनेच्या त्या अध्यक्ष आहेत. तुळजापूरचे भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या त्या पत्नी आहेत.
2012 : समाजकार्यातून राजकारणात पदार्पण. धाराशिव जिल्ह्यातील केशेगाव जिल्हा परिषद गटातून विक्रमी मतांनी विजयी.
2017 : धाराशिव जिल्ह्यातील तेर जिल्हा परिषद गटातून विजयी. याच कार्यकाळात जिल्हा परिषद उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळली. जिल्हा परिषदेच्या शिक्षण आणि आरोग्य सभापतीपदाचा पदभार सांभाळत शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावली.जिल्हा परिषद उपाध्यक्ष पदाच्या कार्यकाळात जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्यसेवेसाठी स्वतःला झोकून देऊन काम केले. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्राथमिक उपकेंद्राचे जिल्हाभरात जाळे निर्माण केले. अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या यांचे मानधन वाढीसाठी विशेष प्रयत्न प्रलंबित प्रश्न मार्गी लावला. जिल्हा परीषद शिक्षण विभागाच्या माध्यमातून शाळा दुरुस्ती नवीन वर्गखोल्या, संरक्षण भिंती बांधणे आदी कामे करून जि.प.शाळांचे रुपडे पालटले.