
RBI MPC Meeting LIVE Updates: गुंतवणूकदारांना चालना, अर्थव्यवस्थेला मजबुती मिळण्याची शक्यता
मुंबई : देशातील कर्जदार आणि कर्जावर ईएमआय भरणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) बाजाराच्या अपेक्षेपेक्षा मोठा निर्णय घेत, रेपो दरात तब्बल 0.50 टक्क्यांची कपात केली आहे. यामुळे आता रेपो दर 5.5 टक्क्यांवर आला असून गृहकर्ज, वाहनकर्ज यासह सर्वच प्रकारची कर्जे स्वस्त होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. RBI MPC Meeting LIVE Updates
रिझर्व्ह बँकेची दोन दिवसांची मौद्रिक धोरण समिती (MPC) बैठक 4 जूनपासून सुरू झाली होती. या बैठकीनंतर RBIचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी 50 बेसिस पॉइंटची कपात जाहीर केली. त्यांनी स्पष्ट केले की, या पावलामुळे देशातील गुंतवणूकदारांना संधी मिळेल तसेच अर्थव्यवस्थेला गती मिळेल. जागतिक मंदीच्या पार्श्वभूमीवर भारतीय बाजारात ही सकारात्मक चाल मानली जात आहे.
मल्होत्रा यांनी यावेळी आणखी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. एसडीएफ दर 5.75 टक्क्यांवरून 5.25 टक्के, तर एमएसएफ दर 6.25 टक्क्यांवरून 5.75 टक्के करण्यात आला आहे. तसेच, कॅश रिझर्व रेशिओ (CRR) 4 टक्क्यांवरून 3 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले आहे.
आरबीआयने या वर्षात तिसऱ्यांदा रेपो दरात कपात केली असून, हे पाऊल अमेरिकेने ॲल्युमिनियम आणि स्टीलवर आयात शुल्क 50% पर्यंत वाढविल्यानंतर घेतले आहे. भारत या वस्तूंचा मोठा निर्यातदार असल्याने, ही कारवाई भारतासाठी आर्थिक दृष्टिकोनातून धक्का मानली जात होती. त्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत मागणीला चालना देण्यासाठी आणि आर्थिक धोरण संतुलित ठेवण्यासाठी ही धोरणात्मक कपात महत्त्वाची मानली जाते.
2026 या आर्थिक वर्षात देशाचा विकासदर 6.5% राहील, असा विश्वास आरबीआयने व्यक्त केला आहे. गव्हर्नर मल्होत्रा यांनी सांगितले की, पहिल्या तिमाहीत 6.5%, दुसऱ्या तिमाहीत 6.7%, तिसऱ्या तिमाहीत 6.6% आणि चौथ्या तिमाहीत 6.3% एवढा विकासदर अपेक्षित आहे.आरबीआयच्या या निर्णयामुळे बँकांकडून कर्जदर कमी करण्यात येण्याची शक्यता असून, त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांपासून ते उद्योग जगतापर्यंत सर्वांनाच दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.


