Anjali Damania : सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी एका सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून शरद पवार यांच्यावर टीका
•अजित पवार आणि शरद पवार यांनी देखील एकमेकांवर आरोप प्रत्यारोप
मुंबई :- बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये पवार विरुद्ध पवार सामना रंगला आहे. यातच अजित पवार आणि शरद पवार यांनी देखील एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू केले आहेत. मात्र, या संदर्भात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यावर टीका करताना शरद पवार यांनी घरचे पवार आणि बाहेरून आलेले पवार असे म्हणत बारामतीकरांना सुप्रिया सुळे यांना मतदान करण्याचे आवाहन केले होते. आता शरद पवार यांच्या या वक्तव्यावर टीका होत आहे. सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी एका सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.
मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार या माध्यमातून शरद पवार यांना काय म्हणायचे आहे? एखादी महिला तीस वर्षे, चाळीस वर्षे लग्न करून आल्यानंतर एका घरात राहत असेल, तर ती त्यांची होत नाही? बाहेरून आलेली राहते का? असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी शरद पवार यांना विचारला आहे. वास्तविक काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी मुली बाबतीत केलेले वक्तव्य खूप छान वाटले होते. शरद पवार यांच्या मुली विषयीचे विचार ऐकून प्रगतिशील विचार असल्याची जाणीव झाली होती. मात्र, आता माझ्यासारख्या सामाजिक कार्य करणाऱ्या महिलेला पवार यांचे आताच वक्तव्य अजिबात आवडणारे नाही. माझ्यासारख्या सून म्हणून दुसऱ्या घरात आलेल्या महिलांना देखील हे वक्तव्य अजिबात आवडणारे नसल्याचे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.
नेमके काय म्हणाले होते शरद पवार
बारामती लोकसभा मतदार संघात शरद पवारांच्या कन्या तथा विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांचा सामना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी होणार आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी मतदारांना पवार नाव पाहून मतदान करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात गरमागरम चर्चा रंगली असताना शरद पवार यांनी त्यांच्या या विधानाचा चांगलाच समाचार घेतला होता. तसेच मूळ पवार व बाहेरून आलेला पवार यात फरक असल्याचे स्पष्ट केले होते. माझी निवडणूक, अजितची निवडणूक असो, किंवा सुप्रियाची निवडणूक असो माझ्या कुटुंबातील बाकीचे घटक लोकांच्यात जातात. भूमिका मांडतात आणि लोकांचा पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्न करतात, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले होते. पवारांनाच मतदान करा, यामध्ये काही चुकीचे नाही. पण मूळ पवार आणि बाहेरुन आलेला पवार यामध्ये फरक असल्याचे शरद पवार म्हणाले होते.