Anjali Damania : अजित पवारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे वाद; “उपमुख्यमंत्र्यांना हे शोभते का?”, अंजली दमानियांचा सवाल

•Anjali Damania On Ajit Pawar माढ्यात अवैध उत्खननावरील कारवाईवरून फोनवर संतापले अजित पवार; थेट फोन कॉलवर महिला अधिकाऱ्याला दम
पुणे :- सोलापूर जिल्ह्यातील माढा येथे अवैध उत्खननावर कारवाई करणाऱ्या एका महिला आयपीएस अधिकाऱ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोनवरून कारवाई थांबवण्यास सांगितल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे नवा वाद निर्माण झाला असून, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवारांवर कठोर टीका केली आहे.
व्हिडिओमध्ये, स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या फोनवरून बोलताना अजित पवार त्या महिला अधिकाऱ्याला म्हणाले, “मी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतोय. मी तुम्हाला कारवाई थांबवण्याचे आदेश देतो. तहसीलदारांना सांगा की, अजित पवार यांचा फोन आला होता. मला उपमुख्यमंत्र्यांनी कारवाई थांबवण्यास सांगितले आहे.”
यावर त्या महिला अधिकाऱ्याने थेटपणाने उत्तर दिले, “सर, तुम्ही थेट माझ्या फोनवर कॉल करा ना.” अधिकाऱ्याच्या या मागणीमुळे अजित पवार संतापले आणि त्यांनी, “मी तुमच्यावर कारवाई करीन. तुम्ही मला सांगत आहात की, थेट कॉल करा. तुमचा नंबर द्या मी कॉल करतो,” असे म्हटले.
‘एका उपमुख्यमंत्र्यांना हे शोभतं का?’
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अंजली दमानिया यांनी अजित पवारांवर ‘एक्स’ (X) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून टीका केली आहे. “महिला अधिकारी आपले काम करत होत्या, तर इतरांच्या सांगण्यावरून, त्यांना कॉल करून धमकी देणे एका उपमुख्यमंत्र्यांना शोभतं का?” असा सवाल त्यांनी केला.
दमानिया यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे, “‘तुझे डेरिंग कसे झाले’ असे त्या बाईंना अजित पवार म्हणाले? इतकी दादागिरी? याबद्दल अजित पवारांनी त्या महिलेची माफी मागितली पाहिजे.”



