Anil Parab : “मंत्र्यांचे व्हिडीओ व्हायरल… मग जनसुरक्षा कुठे?”

•अनिल परबांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल – मंत्र्यांच्या खासगीपणावर घाला, आता बेडरूमही सुरक्षित नाही!
मुंबई | राज्यात सध्या मंत्र्यांचे खाजगी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होण्याच्या घटना समोर येत असून, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राची नाचक्की होत आहे. अशा संवेदनशील पार्श्वभूमीवर विधान परिषदेच्या चर्चेत शिवसेना (ठाकरे गट) आमदार अनिल परब यांनी सरकारवर जोरदार टीका केली.
“मंत्र्यांचे बेडरूममधील खासगी व्हिडीओही बाहेर येत आहेत, ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. सायबर सुरक्षेच्या यंत्रणांचा भंग होऊन खासगी जीवन धोक्यात आलंय. डिजिटायझेशनचा धोका थेट मंत्र्यांच्या घरात पोहोचला आहे,” असं परब यांनी विधानपरिषदेत 289 अन्वये मुद्दा उपस्थित करताना सांगितलं.
तसेच, “जनसुरक्षा विधेयक मंजूर करताना सरकारने मोठ्या गोष्टी केल्या. पण ज्या मंत्र्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर फिरतायत, त्यांची सुरक्षा आधी सांभाळा,” असा उपरोधिक टोला परब यांनी लगावला. “या मंत्र्यांना दोन कपडे द्या, इतकंच काय ते शिल्लक आहे,” असं म्हणत त्यांनी सभागृहात हास्याची लाट निर्माण केली.
तसेच, मंत्री जाहीर सभांमध्ये ‘पैसे कमी पडले तर आम्ही देऊ’ म्हणतात आणि दुसरीकडे त्यांच्या घरी रोख्यांच्या बॅगा आढळतात, असा आरोपही परब यांनी केला.
दरम्यान, आमदार परब आणि मंत्री शंभूराज देसाई यांच्यात नुकताच जोरदार वाद झाला होता. मराठी माणसाला घर खरेदीत आरक्षण मिळावे यासाठी आवाज उठवणाऱ्या परब यांना देसाईंनी “बाहेर नीघ, तुला दाखवतो,” असेही सुनावले होते. त्यानंतर “गद्दार” शब्दाच्या वापरावरून राजकीय वातावरण अधिकच तापलं आहे.



