Anil Deshmukh : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञासिंह, पुरोहितसह 7 आरोपी निर्दोष!

Anil Deshmukh On Malegaon Bomb Blast : अनिल देशमुख यांची ‘दहशतवादाला धर्म नसतो’ अशी प्रतिक्रिया; पीडित उच्च न्यायालयात दाद मागणार
मुंबई :- 2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील बहुप्रतीक्षित निकाल आज राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) कायद्यांतर्गत स्थापन विशेष न्यायालयाने दिला. यामध्ये भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, ले. कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह एकूण सात आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष सुटका करण्यात आली आहे. देशातील दीर्घकाळ चाललेल्या दहशतवादाशी संबंधित खटल्यांपैकी हा एक महत्त्वाचा निकाल मानला जात आहे. Anil Deshmukh On Malegaon Bomb Blast
या निकालावर राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई सत्र न्यायालयाबाहेर माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. “धर्माचा आणि दहशतवादाचा कोणताही संबंध नाही,” असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. मालेगाव स्फोटानंतर देशात ‘भगवा दहशतवाद’ या शब्दाची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. याबाबत विचारले असता देशमुख म्हणाले, “भगवा आणि दहशतवादाचा काहीही संबंध नाही. दहशतवाद हा दहशतवाद असतो, त्याला धर्म नसतो.” मालेगाव बॉम्बस्फोटातील खरे आरोपी कोण, असे विचारले असता, “या प्रकरणाच्या पुढील चौकशीतून ते समोर येईल,” असेही देशमुख यांनी नमूद केले.
दरम्यान, या निकालामुळे पीडितांच्या नातेवाईकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. मालेगावमधील प्रत्यक्षदर्शी व पीडितांचे नातेवाईक डॉ. अन्सारी अखलाक अहमद यांनी न्यायालयाबाहेर येऊन दुःख व्यक्त केले. “हा निकाल ऐकून दुःख झाले आहे. आम्ही या निकालाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देऊ,” असे डॉ. अहमद यांनी सांगितले. या प्रकरणामुळे आता न्यायालयीन लढाई पुढील टप्प्यात जाण्याची चिन्हे आहेत.


