
Anil Ambani At ED Office : रिलायन्स होम फायनान्ससह तीन कंपन्यांची चौकशी; बनावट कंपन्या आणि कागदपत्रांच्या वापराचा आरोप
ANI :- रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष अनिल अंबानी Anil Ambani हे 17,000 कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी दिल्लीतील सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात पोहोचले आहेत. गेल्या आठवड्यात त्यांना ईडीने कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी बोलावले होते. या प्रकरणात रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड (RHFL), रिलायन्स कमर्शियल फायनान्स लिमिटेड (RCFL) आणि रिलायन्स कम्युनिकेशन्स (RCom) या कंपन्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.
काय आहेत आरोप?
अनिल अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुपच्या या कंपन्यांनी विविध बँकांकडून हजारो कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, हे कर्ज ज्या उद्देशासाठी घेतले होते, त्यासाठी न वापरता ते बनावट कंपन्यांच्या (Shell Companies) माध्यमातून फिरवण्यात आले, असा आरोप आहे. ईडीच्या तपासानुसार, या व्यवहारांमध्ये अनेक बनावट कागदपत्रे आणि बँक गॅरंटीचा वापर करण्यात आल्याचेही समोर आले आहे.
प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँड्रिंग ॲक्ट (PMLA) अंतर्गत सुरू झालेली ही चौकशी 20 हून अधिक खासगी आणि सरकारी बँकांच्या कर्जाशी संबंधित आहे. ही सर्व कर्जे आता नॉन-परफॉर्मिंग ॲसेट्स (NPA) मध्ये रूपांतरित झाली आहेत. ईडीच्या तपासानुसार, RHFL वर 5,901 कोटी, RCFL वर 8,226 कोटी आणि RCom वर जवळपास 4,105 कोटी रुपयांचे कर्ज थकीत आहे. या गंभीर आरोपांनंतर ईडीच्या चौकशीला अनिल अंबानी यांनी दिलेल्या उत्तरावर आता सर्वांचे लक्ष लागून आहे. या चौकशीतून नेमके काय निष्पन्न होते, हे लवकरच स्पष्ट होईल.



