
Prashant Thakur On Sharad Pawar : शरद पवारांच्या घराणेशाहीवर प्रहार; प्रशांत ठाकूर यांचा शिक्षण संस्थाचालकांवर निशाणा, तर खा. बारणेंचा ’70 हजारांचा’ अजब हिशोब
पनवेल | पनवेल महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कळंबोलीत आयोजित महायुतीच्या जाहीर सभेत शहाजीबापू पाटील यांनी आपल्या रोखठोक भाषणाने विरोधकांचा समाचार घेतला. प्रभाग क्रमांक 8 मधील भाजप महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित या सभेत त्यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे आणि शेकापवर बोचरी टीका केली.
शेकाप आणि शरद पवारांवर टीका
शहाजीबापू यांनी शेकापचा उल्लेख “शेपूट कापलेला पक्ष” असा करत, हा पक्ष केवळ निवडणुका लढवण्यापुरता उरला असल्याची टीका केली. शरद पवारांवर निशाणा साधताना ते म्हणाले, “पवारांनी कळंबोलीत पिता-पुत्रांना (सतीश पाटील व चिरंजीव) एकाच प्रभागात उमेदवारी देऊन घराणेशाहीचा कळस गाठला आहे. पंतप्रधान मोदी आणि पवार साहेब कधी एकत्र येतील हे कोणालाच कळणार नाही, पण सध्या त्यांची घराणेशाही जनतेने ओळखावी.”
ठाकरे बंधूंचे मनोमिलन म्हणजे ‘अमेरिका-युक्रेन’ युती
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्यावर भाष्य करताना बापू म्हणाले, “यांची तुलना थेट अमेरिका आणि युक्रेनच्या युतीसारखी आहे. हे मनोमिलन केवळ मुंबई महापालिका निवडणुकीपुरते आहे, त्यानंतर हे दोन्ही बंधू पुन्हा वेगळे होतील.” यावेळी त्यांनी संजय राऊत यांचा उल्लेख “सकाळचा भोंगा” असा करत उपस्थित जनसमुदायात हस्यकल्लोळ निर्माण केला.
प्रशांत ठाकूर यांचा शिक्षणसम्राटांवर प्रहार
आमदार प्रशांत ठाकूर यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील यांचे नाव न घेता त्यांच्या शिक्षण संस्थांवर टीका केली. “जेव्हा नागरिक शैक्षणिक शुल्कात सवलत मागत होते, तेव्हा या संस्थाचालकांनी निर्दयीपणे कंपन्यांसारखा कारभार केला. आता मतदारांनी त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे,” असे आवाहन ठाकूर यांनी केले.
खासदार बारणेंचा ’70 हजारांचा’ अजब हिशोब
खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी लाडकी बहीण योजनेवर बोलताना महिलांना भावनिक साद घातली. मात्र, “पुढील पाच वर्षात लाडक्या बहिणींना 70 हजार रुपये मिळतील,” असे विधान केल्याने सभेत कुजबुज सुरू झाली. महिन्याला 1500 रुपयांप्रमाणे 5 वर्षांचे 90 हजार रुपये होतात, मग खासदार साहेबांनी 20 हजार रुपये कुठे कापले? असा प्रश्न उपस्थित महिलांमध्ये चर्चिला जात होता. दरम्यान, बारणे यांनी सिडकोच्या जीर्ण घरांचा प्रश्न आणि रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाबाबतही माहिती दिली.


