मुंबई

Amit Thackeray : ‘मराठा आंदोलक परत का आले, ज्यांनी आश्वासन दिलं त्यांना विचारायला नको का?’

Amit Thackeray On Maratha Reservation : अमित ठाकरेंचा शिंदे-फडणवीसांना रोखठोक सवाल, म्हणाले – ‘तुम्ही कोणाला मूर्ख बनवताय?’

मुंबई :- मराठा आरक्षणाच्या Maratha Reservation मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनावरून मनसे नेते अमित ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. गेल्या वेळी पनवेलमधून माघारी गेलेले आंदोलक पुन्हा का आले, असा सवाल करत, ज्यांनी आश्वासन दिले त्यांना विचारले पाहिजे, असे अमित ठाकरे म्हणाले.

मुंबईत आंदोलकांना एकटं वाटू देणार नाही

आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या मराठा बांधवांना मदत करणार असल्याचे अमित ठाकरे यांनी सांगितले. “मराठा बांधव एखाद-दोन दिवसांची तयारी करून आलेले. त्यांच्याकडचे खाण्याचे सामान, पिण्याचे पाणी आणि औषधे संपली आहेत. कुठूनही आले असले, तरी ते आपलेच आहेत. मुंबईत कुठेही त्यांना एकटे वाटू नये, ही आमची भावना आहे. आम्ही त्यांना मदत करू,” असे ते म्हणाले.

सरकारवर रोखठोक टीका

मनोज जरांगे पाटील यांनी राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेबाबत विचारले असता, अमित ठाकरे यांनी ‘आमची भूमिका स्पष्ट आहे’ असे सांगितले. “मागच्या वेळी मराठा आंदोलक पनवेलपर्यंत येऊन परत गेले होते. त्यांना काय आश्वासन दिलं होतं? आता का परत आले? ज्यांनी आश्वासन दिलं, त्यांना विचारायला नको का? तुम्ही कोणाला मूर्ख बनवताय?” अशा शब्दांत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागली.

‘लोकांना राजकारण कळत नाही’

अमित ठाकरे म्हणाले की, “तिथे जी लोक आहेत, त्यांना त्यामागचं राजकारण कळत नाही. त्यांचे अन्न-पाणी संपले आहे, ते त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे.” लोकलवर परिणाम होत असल्याच्या प्रश्नावर त्यांनी “ते सरकारने बघावे. याचं उत्तर सरकारने द्यावे,” असे म्हटले.

तसेच, “तुम्हाला टेक्निकली काय वाटतं, मागणी पूर्ण करू शकतात का?” या प्रश्नावर, “तुम्ही दरवेळी आमच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवता. यावेळी तुम्ही आला आहात, तर उत्तर घेऊन जा. आरक्षण दिले, तर ते शिक्षण आणि रोजगारात लागणार, तर ते कसे आणि कुठे मिळणार, याचे उत्तर घेऊन जा,” असे म्हणत त्यांनी माध्यमांनाही अप्रत्यक्षपणे फटकारले.

फडणवीसांवरील आरोपांवरही प्रतिक्रिया

देवेंद्र फडणवीस यांच्यावर समाजात तेढ निर्माण करण्याचा आरोप होत असल्याबद्दल विचारले असता, अमित ठाकरे म्हणाले की, “ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांची अशी अजिबात इच्छा नसणार की मुंबईत किंवा महाराष्ट्रात कुठे काही अनुचित घडावे. आपले मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील,” असे सांगत त्यांनी फडणवीसांची बाजू घेतली.

vivek

Recent Posts