
Amit Thackeray On Eknath Shinde : जनतेच्या पैशाची उधळपट्टी थांबवा; पंचतारांकित हॉटेलमधील ‘कैदे’वरून मनसे युवानेत्याने सुनावले खडे बोल
मुंबई l मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे Mumbai BMC Election निकाल लागल्यानंतर आता महापौर कोणाचा होणार, यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. घोडेबाजार आणि नगरसेवक पळवा-पळवीच्या भीतीने शिवसेना (शिंदे गट) पक्षाने आपल्या सर्व 29 नगरसेवकांना वांद्रे येथील ‘ताज लँड्स एंड’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवले आहे. 17 जानेवारीपासून सुरू असलेल्या या ‘हॉटेल पॉलिटिक्स’वर आता मनसे नेते अमित ठाकरे यांनी तीव्र शब्दांत टीका केली आहे. “ज्या जनतेने निवडून दिले, त्यांचे आभार मानण्याऐवजी हे लोकप्रतिनिधी पंचतारांकित हॉटेलच्या बंद दाराआड ‘आनंदाने’ कैद का आहेत?” असा बोचरा सवाल अमित ठाकरे यांनी केला आहे. Mumbai Political Latest News
अमित ठाकरे यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये या परिस्थितीवर नाराजी व्यक्त करताना म्हटले की, “निवडणुकीनंतर लोकप्रतिनिधींनी आपल्या प्रभागात जाऊन लोकांच्या समस्या सोडवायला हव्या होत्या. मात्र, दुर्दैवाने ते आज हॉटेलमध्ये बसून आहेत. हे स्वतःच्याच सहकाऱ्यांवरच्या अविश्वासाचे लक्षण आहे की स्वार्थी राजकारण?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच, या पळवापळवीमुळे सर्वसामान्य मतदारांचा अपमान होत असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्राचे राजकारण किती खाली घसरणार आहे, असा सवाल करत त्यांनी या प्रकाराचा तीव्र निषेध केला आहे.
विशेष म्हणजे, या हॉटेलमध्ये वास्तव्यास असलेल्या इतर पर्यटकांनाही सुरक्षेच्या नावाखाली मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचा दावा अमित ठाकरे यांनी केला आहे. “कष्टाचे पैसे भरून बुकिंग करणाऱ्या पर्यटकांना या राजकीय नाटकामुळे त्रास होतोय, हे दुर्दैवी आहे. स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी सुरू असलेला हा तमाशा आणि जनतेच्या पैशाची उधळपट्टी आता तरी थांबवा,” असे आवाहन त्यांनी केले. “जमल्यास… ज्या जनतेने विश्वास टाकलाय, त्यांच्यासाठी काहीतरी करा,” अशा खोचक शब्दांत त्यांनी सत्ताधाऱ्यांना सुनावले आहे.


