Amit Shah Deep Fake Video Viral : गुन्हे शाखेची मोठी कारवाई, जिग्नेश मेवाणीचा पीए आणि आप नेत्याला अटक
•अमित शाह यांच्या डिपफेक व्हिडिओप्रकरणी देशभरात कारवाई सुरू आहे. अहमदाबाद क्राइम ब्रांचने दोघांना अटक केली आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना नोटीसही पाठवली आहे
ANI :- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या डिपफेक व्हिडिओप्रकरणी अहमदाबाद क्राइम ब्रांचने मोठी कारवाई केली आहे. गुन्हे शाखेने काँग्रेस आमदार जिग्नेश मेवाणी यांचे पीए सतीश वनसोला यांच्यासह 2 जणांना अटक केली आहे. आरबी बारिया असे दुसऱ्या व्यक्तीचे नाव आहे. बरिया हा आम आदमी पक्षाचा कार्यकर्ता असल्याचे सांगण्यात येत आहे.
पीएच्या अटकेवर जिग्नेश मेवाणी म्हणाले, मी कोणत्याही खोट्या गोष्टीचे समर्थन करत नाही. आज सोशल मीडियाचे युग आहे. निवडणुकीच्या काळात प्रचार करता येत नसल्याने लोकांना अटक केली जात आहे. ते म्हणाले, भाजपचा आयटी सेल खोट्या बातम्या पसरवतो.
अमित शाह यांचे बनावट व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, आसाम काँग्रेसचे नेते रितम सिंह यांना बनावट व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. आसामचे मुख्यमंत्री म्हणाले, रितम सिंह हे काँग्रेसच्या वॉर रूमचे समन्वयक आहेत.
दिल्ली पोलिसांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनाही नोटीस पाठवली आहे. मात्र, आपण घाबरत नसल्याचे रेड्डी म्हणाले. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आतापर्यंत निवडणूक जिंकण्यासाठी ईडी आणि सीबीआयसारख्या एजन्सीचा वापर करत होते आणि आता ते दिल्ली पोलिसांचाही वापर करत आहेत.
केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांचा एक डिपफेक व्हिडिओ शेअर केल्याबद्दल महाराष्ट्र युवक काँग्रेस आणि इतर 16 जणांविरोधात सोमवारी तक्रार दाखल करण्यात आली होती, ज्यामध्ये ते एससी, एसटी आणि ओबीसींच्या आरक्षणाच्या अधिकारात कपात करण्याची घोषणा करत होते. एका अधिकाऱ्याने सांगितले की, मुंबई भाजपचे सचिव प्रतीक कर्पे यांनी तक्रार दाखल केली आहे.वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स सायबर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.