मुंबई

Amit Shah : दिल्लीत तासभर ‘तक्रार पुराण’! एकनाथ शिंदेंची नाराजी ऐकून अमित शाह फक्त एवढेच बोलले

•फडणवीस-चव्हाणांविरोधात थेट ‘हायकमांड’कडे तक्रार; ‘माझं सर्व घडामोडींवर लक्ष आहे’, शाहांच्या सूचक विधानानंतर शिंदेंनी संभाव्य प्रवेश थांबवले

मुंबई :- राज्यात महायुतीतील वाढलेल्या वितुष्टाच्या पार्श्वभूमीवर, उपमुख्यमंत्री आणि शिवसेना (शिंदे गट) मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी काल (19 नोव्हेंबर) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली. सुमारे तासभर चाललेल्या या भेटीत एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या काही कृतींवर थेट तक्रारींचा पाढा वाचल्याची माहिती समोर आली आहे.

अमित शाह यांच्यासोबतच्या भेटीत एकनाथ शिंदेंनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याविरुद्ध तक्रार केल्याचे कळते. कल्याण डोंबिवलीसह अनेक भागांत भाजप प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वात ‘ऑपरेशन लोटस’ राबवून शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि माजी नगरसेवक फोडले जात आहेत. भाजपच्या याच कृतीवर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच, उद्धव ठाकरेंना बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारक समितीवर घेतल्यावरूनही शिंदेंनी अमित शाहांकडे नाराजी व्यक्त केल्याची माहिती मिळाली आहे.

एकनाथ शिंदे यांनी तक्रारींचा पाढा वाचल्यानंतर अमित शाह यांनी मात्र अत्यंत शांत आणि सूचक उत्तर दिले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित शाह यांनी शिंदेंची संपूर्ण तक्रार ऐकून घेतली आणि फक्त एक वाक्य बोलून विषय संपवला. “मला बऱ्याच गोष्टी माहिती आहेत. या संपूर्ण घडामोडींकडे माझं लक्ष आहे,” असे महत्त्वपूर्ण विधान अमित शाह यांनी भेटीत केल्याचे समजते.

अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर, एकनाथ शिंदे यांनी तातडीने मोठा निर्णय घेतला आहे. भाजपने पदाधिकारी फोडल्यानंतर नाराज झालेल्या शिवसेनेनेही मित्रपक्षातील असंतुष्ट पदाधिकाऱ्यांना पक्षात घेण्याची रणनीती आखली होती. 22 तारखेला होणारे हे सर्व संभाव्य प्रवेश शिंदे यांनी रोखण्याचे आदेश मंत्री आणि पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. महायुतीत वितुष्ट येईल असे कोणतेही काम करू नका, अशा स्पष्ट सूचना शिंदेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0