महाराष्ट्र

Ambernath News :”लिफ्टमध्ये विकृतीचा कहर! अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण, हाताला चावा घेणाऱ्या रहिवाशावर गुन्हा”

•Ambernath Child Assault : सीसीटीव्हीत कैद झालेली संतापजनक घटना; आरोपीवर दोन गुन्हे दाखल

अंबरनाथ | अंबरनाथ पूर्वेतील पालेगाव परिसरात एका सोसायटीत घडलेली घटना समाजाची संवेदनशीलता हादरवणारी आहे. केवळ लिफ्टचा दरवाजा बंद केल्याच्या कारणावरून कैलास तनवाणी या रहिवाशाने एका अल्पवयीन मुलाला लिफ्टमध्ये बेदम मारहाण केली. इतकंच नव्हे तर, या विकृताने मुलाच्या हाताला चावा देखील घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

ही घटना पटेल जियम सोसायटीत 4 जुलै रोजी सायंकाळी घडली. क्लाससाठी निघालेला अल्पवयीन मुलगा लिफ्टमध्ये असताना कैलास तनवाणी देखील लिफ्टमध्ये आला. त्या मुलाने दरवाजा बंद करत असल्याचा राग काढत कैलास याने त्याला “तू मोहितचा दोस्त आहेस का?” असा प्रश्न विचारून, पाच वेळा कानशिलात लगावल्या. या हल्ल्यापासून वाचण्यासाठी मुलाने हात पुढे केला असता, तनवाणीने त्या हातालाही चावा घेतला.

या हल्ल्यात कैलासच्या हातात असलेल्या मोबाईल आणि चाव्यांमुळे मुलाच्या शरीराला गंभीर आतील दुखापती झाल्या असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.संपूर्ण प्रकार लिफ्टमधील सीसीटीव्हीत स्पष्टपणे कैद झाला असून, पालकांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. मात्र सुरुवातीला पोलिसांनी या घटनेचं गांभीर्य न लक्षात घेत अदखलपात्र गुन्हा नोंदवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. सततच्या पाठपुराव्यानंतर कैलास तनवाणी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

याच घटनेनंतर कैलासच्या पत्नीनेही कौटुंबिक वादातून त्याच्याविरोधात स्वतंत्र तक्रार दाखल केली असून, दोन वेगवेगळे गुन्हे त्याच्यावर नोंदवले गेले आहेत.

vivek

Recent Posts