
Thackeray Mumbai Latest Plan : मुंबईकरांचा स्वाभिमान’ केंद्रस्थानी: तरुणांना 1 लाखापर्यंत कर्ज, 100 युनिट मोफत वीज आणि कोळी महिलांसाठी 10 रुपयांत जेवण!
मुंबई | मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या Mumbai BMC Election रणसंग्रामात ‘ठाकरे बंधू’ (आदित्य आणि अमित ठाकरे) यांनी आज दादरच्या शिवसेना भवन येथे एकत्रित येत युतीचा भव्य जाहीरनामा प्रसिद्ध केला. राज्याचे लक्ष लागलेल्या या निवडणुकीत शिवसेना (UBT) आणि मनसे यांच्या युतीने मुंबईकरांना आकर्षित करण्यासाठी मोठ्या सवलतींची घोषणा केली आहे. “आम्ही निवडणुकीपुरती लाडकी बहीण योजना आणत नाही, तर हा मुंबईकरांचा ‘स्वाभिमान’ आहे,” असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी विरोधकांवर निशाणा साधला.


जाहीरनाम्यातील ‘सुपर 10’ मोठ्या घोषणा
मालमत्ता कर माफी: यापूर्वी ५०० स्क्वेअर फुटांपर्यंत टॅक्स माफ होता, आता ७०० स्क्वेअर फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर (Property Tax) पूर्णपणे माफ करण्याची घोषणा.
स्वाभिमान निधी: मुंबईतील घरकाम करणाऱ्या कष्टकरी महिलांना दरमहा १,५०० रुपये स्वाभिमान निधी दिला जाईल.
तरुणांना स्वयंरोजगार: १ लाख तरुण-तरुणींना व्यवसायासाठी २५ हजार ते १ लाख रुपयांपर्यंत स्वयंरोजगार सहायता निधी.
मोफत वीज व पाणी: घरगुती वापरासाठी १०० युनिटपर्यंत वीज मोफत देणार; तसेच पाण्याचे दर स्थिर ठेवण्याचे आश्वासन.
ज्युनिअर कॉलेज: पालिकेच्या शाळांमध्येच १० वी नंतर ज्युनिअर कॉलेज सुरू करणार, सर्व बोर्डांच्या शाळांत मराठी अनिवार्य असणार.
पाळणाघर सुविधा: नोकरी करणाऱ्या महिलांच्या मदतीसाठी प्रत्येक विधानसभा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय दर्जाचे पाळणाघर सुरू करणार.
कोळी महिलांना आधार: ‘माँ साहेब किचन’च्या माध्यमातून कोळी भगिनींना केवळ १० रुपयांत जेवण मिळणार.
पार्किंग धोरण: मुंबईत ‘१ फ्लॅट १ पार्किंग’ धोरण राबवणार आणि बीएमसीची सध्याची पार्किंग सुविधा मोफत करणार.
बेस्ट बस तिकीट: प्रवाशांना दिलासा देण्यासाठी ५, १०, १५ आणि २० रुपये असे फ्लॅट दर (Flat Rates) करणार.
आरोग्य सेवा: मुंबईत कर्करोगाचे (Cancer) आणखी एक मोठे रुग्णालय आणि प्रत्येक वॉर्डात ‘मिनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स’ उभारणार.
“मुंबई विकणाऱ्यांचा माज उतरवू” – अमित ठाकरे
जाहीरनामा प्रसिद्ध करताना अमित ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला. “नाशिकमध्ये झाडे कापण्याचा माज असो किंवा मुंबईची जागा केंद्राला देण्याचे प्रयत्न, आपल्याला हा माज मोडीत काढायचा आहे,” असे ते म्हणाले. मुंबई पोर्ट ट्रस्टची (BPT) 1800 एकर जागा मुंबईच्या हक्काची असून ती मिळवण्यासाठी न्यायालयीन लढाई लढण्याची तयारीही त्यांनी दर्शवली.
पर्यावरण आणि सुसाट मुंबई
आदित्य ठाकरे यांनी ‘क्लायमेट ॲक्शन प्लॅन’वर भर दिला. मुंबईकरांना मोकळा श्वास घेता यावा यासाठी फुटपाथ मोकळे करणे आणि शहरात पर्यावरणाचे रक्षण करणे हा आमचा हट्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


