Ambadas Danve : विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचे नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ राज्यपालाच्या भेटीला
•विधान परिषदेच्या सभापती पदाची निवडणूक घ्यावी अशी मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांची राज्यपालांकडे, विधान परिषदेच्या नेत्यासह आदित्य ठाकरे ही उपस्थित
मुंबई :- राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांची महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भेट घेतली. मंगळवारी (09, जुलै) रोजी राजभवनवर विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्ट मंडळ राज्यपालाच्या भेटीला गेले होते. यामध्ये महाविकास आघाडीचे नेत्यांसह विधानपरिषदेचे आमदार आणि आदित्य ठाकरे हेही उपस्थित होते. आदित्य ठाकरे आणि विधान परिषदेचे महाविकास आघाडीचे आमदार यांच्याकडून राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांना विधान विधान परिषदेच्या सभापतींची तात्काळ नियुक्ती करावी असे मागणीचे निवेदन राज्यपालांना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिले आहे.
तत्कालीन सभापती रामराजे निंबाळकर यांच्या आमदारकीची मुदत 7 जुलै 2022 रोजी संपल्यानंतर सभापतिपदाचा कार्यभार उपसभापती नीलम गोन्हेंकडे सोपवण्यात आला होता. त्यानंतर सभापतिपद रिक्तच आहे. याच सभागृहाच्या कामकाजावर परिणाम होत असल्याचे मविआच्या नेत्यांना आता वाटू लागले आहे. 12 जुलैला विधान परिषदेतील 11 आमदारांची निवडणूक होत आहे. त्यानंतर राज्यपाल नियुक्त 12 आमदारही सभागृहात येतील, अशी शक्यता आहे. म्हणून हालचाली सुरू झाल्या आहेत. गेल्या आठवड्यात शनिवारी उपसभापती गो-हे यांनी उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यावर आमदार अनिल परब यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर गो-हे यांनी सारवासारव करत ते वक्तव्य कामकाजातून वगळण्यात येईल, असे जाहीर केले. तो संदर्भही सभापती निवडणुकीमागे असावा, अशी चर्चा आहे.