क्राईम न्यूजमुंबई
Trending

अक्षय कुमारच्या ताफ्याला मुंबईत भीषण अपघात! भरधाव मर्सिडीजने रिक्षाला चिरडले; सुरक्षा वाहन हवेत उडाले

Akshay Kumar Accident Update : जुहू परिसरात थरार; रिक्षाचालकाची प्रकृती गंभीर असून अक्षय कुमार सुदैवाने सुरक्षित; अपघाताचा व्हिडिओ व्हायरल

मुंबई l बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारच्या ताफ्याला सोमवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास जुहू येथील थिंक जिमजवळ भीषण अपघाताचा सामना करावा लागला. अक्षय कुमार आपल्या कारमधून जात असताना त्यांच्या ताफ्यातील सुरक्षा वाहनाला (Escort SUV) मागून येणाऱ्या एका भरधाव मर्सिडीज कारने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, मर्सिडीज आणि सुरक्षा वाहनाच्या मध्ये असलेली बासित खान यांची ऑटो रिक्षा अक्षरशः चिरडली गेली. मर्सिडीज चालकाने धडक दिल्यानंतरही वेग न रोखल्यामुळे रिक्षा सुरक्षा वाहनाच्या खाली घुसली आणि त्यामुळे अक्षय कुमार यांचे सुरक्षा वाहन चक्क हवेत उचलले गेले.

या भीषण अपघातात रिक्षाचा चक्काचूर झाला असून चालक बासित खान गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताचा मोठा आवाज ऐकून अक्षय कुमार स्वतः कारच्या बाहेर आले होते, मात्र सुरक्षेच्या कारणास्तव त्यांच्या टीमने त्यांना तातडीने दुसऱ्या वाहनातून सुरक्षित स्थळी हलवले. स्थानिक नागरिकांनी मोठ्या शिताफीने रिक्षा बाहेर काढून जखमी चालकाला रुग्णालयात दाखल केले. मात्र, जखमी चालकाच्या कुटुंबाने या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया दिली असून, मर्सिडीज चालकाकडून उपचारांचा खर्च आणि नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी केली आहे. “आम्ही गरीब आहोत, माझ्या भावाची अवस्था गंभीर असून पोलिसांकडून योग्य सहकार्य मिळावे,” अशी आर्त हाक समीर खान (चालकाचा भाऊ) याने दिली आहे.

घटनेची माहिती मिळताच जुहू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मर्सिडीज कार जप्त केली असून चालकाला ताब्यात घेतले आहे. या अपघाताचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अक्षय कुमार यांचे सुरक्षा वाहन रिक्षावर चढलेल्या अवस्थेत दिसत आहे. अक्षय कुमार यांच्या पीआर टीमने अद्याप या विषयावर कोणतेही अधिकृत भाष्य केलेले नाही. पोलीस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, मर्सिडीज चालक मद्यधुंद अवस्थेत होता का, याचीही चौकशी केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0