पुणे

Ajit Pawar : ‘आता आपल्यालाच पांघरूण घालायचंय!’; अजित पवारांकडून भर सभेत राजकीय मिश्किलता आणि फटकेबाजी

•भाजप, शरद पवार गटाच्या प्रमुख नेत्यांचा अजित पवार गटात प्रवेश; जालिंदर कामठे, मुरलीधर निंबाळकर यांचे पक्षप्रवेश

पुणे :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (अजित पवार गट) फूट पडल्यानंतर दोन्ही गटाचे नेते सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये एकत्र येणे टाळत असताना, आज पुण्यात अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात अजित पवारांनी आपल्या खास शैलीतील राजकीय फटकेबाजी आणि मिश्किल संवादाने कार्यकर्त्यांना जिंकले. यावेळी भाजप आणि शरद पवार गटातील प्रमुख नेत्यांनी त्यांच्या गटात प्रवेश केला.

पुणे जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे, जिल्हा भूविकास बँकेचे माजी संचालक मुरलीधर निंबाळकर, काँग्रेसचे नेते रोहन सुरवसे पाटील आणि शरद पवार गटाच्या नेत्या स्वाती चिटणीस यांच्यासह अनेक नेत्यांनी अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

‘मागचा अजित पवार आणि आत्ताच्या अजित पवारमध्ये फरक’

पक्षप्रवेश करणाऱ्या नेत्यांशी संवाद साधताना अजित पवार यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. खास करून जालिंदर कामठे यांना उद्देशून ते म्हणाले, “अजित पवाराला भेटावं की नाही, त्याचा मूड आहे की नाही, हे जालिंदर भाऊला चांगलं माहीत आहे.”

पण लगेच त्यांनी आपल्या बदललेल्या भूमिकेवर मिश्किल टिप्पणी केली, ज्याने सभागृहात एकच हशा पिकला. ते म्हणाले:

“पण तुम्हाला एक कळतंय का? मागचा अजित पवार आणि आताच्या अजित पवारमध्ये खूप फरक पडला आहे. जसं वय वाढतं, तसं आपल्याला बदलावं लागतं, तशी मॅच्युरिटी येते. आपण पूर्वी काही केलं, तर आपल्यावर पांघरूण घालायला साहेब (शरद पवार) असायचे, पण आता आपल्यालाच पांघरूण घालायचं आहे!”

‘चुलता-पुतण्याचं मला नको सांगू’
भाजपचे नेते जालिंदर कामठे यांच्या पक्षप्रवेशानंतर अजित पवार यांनी भाषणादरम्यान, राकेश कामठे यांचा उल्लेख केला. त्याचवेळी उपस्थित एका कार्यकर्त्याने, “चुलत्या-पुतण्याचं नातं आहे,” असे खालून बोलताच अजित पवार यांनी त्याला आपल्या खास शैलीत थांबवले.

अजित पवार म्हणाले, “चुलता पुतण्याचं तू मला नको सांगू. मागच्या पिढीचं नको सांगू आणि आताच्या ही पिढीचं नको सांगू आणि पुढच्या पिढीचं देखील नको सांगू!” अजित पवारांच्या या थेट टोलेबाजीमुळे उपस्थितांमध्ये मोठा हशा पिकला.

‘माझी भावकीच मला सोडून गेली’

शिरूर येथील विधानसभा निवडणुकीतील एका घटनेची आठवण सांगताना अजित पवार म्हणाले, शिरूरमध्ये माझी भावकीच मला सोडून गेली होती. ते पालकमंत्रिपदाची स्वप्न बघत होते. पण मी त्यांना सांगितले, “तू मला सोडून गेला आहेस, मी तुला पाडणार. तू कसा निवडून येतो हे मी पाहिन आणि मी आपल्या उमेदवाराला निवडून आणला.” असे सांगत त्यांनी शरद पवार गटाचे माजी आमदार अशोक पवार यांनाही टोला लगावला.
या निमित्ताने, राजकारणात कितीही मतभेद असले तरी, अजित पवार यांनी आपल्या भाषणातून कार्यकर्त्यांशी जुळवून घेत संवाद आणि विनोदबुद्धीचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित केले.

vivek

Recent Posts