Ajit Pawar News: अजितदादांचा ‘तो’ शेवटचा शब्द अन् विमानाचा स्फोट! अपघाताच्या अवघ्या काही मिनिटांपूर्वीचा ‘कॉल’ समोर

Ajit Pawar Latest News : “आम्ही सर्व जाती-धर्माला सोबत घेऊन चालतो”; कार्यकर्त्याशी झालेला ‘तो’ संवाद ठरला आयुष्यातील अखेरचा
बारामती | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र आजही शोकसागरात बुडालेला आहे. बारामतीला जिल्हा परिषदेच्या प्रचारासाठी जात असताना झालेल्या विमान अपघातात त्यांचा दुर्दैवी अंत झाला. मात्र, विमान लँड होण्यापूर्वी आणि अपघाताचा स्फोट होण्याआधी अवघ्या काही मिनिटे आधी दादांनी केलेला शेवटचा फोन कॉल आता समोर आला आहे. सकाळी 8 वाजून 37 मिनिटांनी झालेला हा संवाद दादांच्या कामाप्रती असलेली तत्परता आणि शेवटच्या श्वासापर्यंत सर्वसमावेशक राजकारणाचा ध्यास अधोरेखित करणारा ठरला आहे.
विमानात रेंज मिळताच केला कॉल
अजित पवारांचे नातेवाईक आणि कार्यकर्ते श्रीजीत पवार यांनी सकाळी 8.19 मिनिटांनी दादांना एक मेसेज पाठवला होता. विमानामध्ये रेंज नसल्याने तो मेसेज दादांना मिळाला नव्हता. मात्र, जसे विमान लँडिंगसाठी जमिनीच्या जवळ आले आणि मोबाइलला रेंज मिळाली, तसा तो मेसेज वाचून दादांनी स्वतःहून 8.37 मिनिटांनी श्रीजीत यांना फोन केला. विमान लँडिंगच्या अत्यंत गंभीर वेळेतही एका सामान्य कार्यकर्त्याच्या मेसेजला उत्तर देण्याच्या दादांच्या या स्वभावाने आता सर्वांचे डोळे पाणावले आहेत.
नेमका काय होता ‘तो’ संवाद?
जिल्हा परिषद निवडणुकीच्या उमेदवारीवरून हा संवाद झाला होता. एका विशिष्ट समाजाला डावलले जात असल्याच्या कार्यकर्त्याच्या भावनेवर दादांनी स्पष्टीकरण दिले.
अजित पवार: “तुम्हाला माहिती नसतं काय नसतं, काहीतरी उगाच… आम्ही पण सगळ्या जाती-धर्माला सोबत घेऊन जातो.”
श्रीजीत पवार: “दादा, मला जे वाटलं ते मी तुम्हाला सांगितलं.”
अजित पवार: “तुमचं सांगणं मान्य आहे, पण तसं नाहीये. माळी समाजाला मी जिल्हा परिषदेची उमेदवारी दिली आहे. जिथे ओबीसी रिझर्वेशन होतं, तिथे आपण उमेदवारी दिली, बाकीच्यांनी (इतर पक्षांनी) दिली नाही. पक्षाने ज्या पद्धतीने निर्णय घेतलेत, त्यानुसार आपण केलेलं आहे.”
श्रीजीत पवार: “चालेल दादा, तुम्हाला जे योग्य वाटतं ते निर्णय घ्या.”
अजित पवार: “ठीक आहे, ओके.”
आणि ‘ओके’ शब्द शेवटचा ठरला…
श्रीजीत पवार यांनी भावूक होत सांगितले की, “दादांनी ‘ओके’ म्हटलं आणि फोन ठेवला. त्यानंतर अवघ्या काही वेळातच त्यांच्या विमान अपघाताची बातमी धडकली. विमानात असतानाही ते कामाबद्दल आणि समाजाला न्याय देण्याबद्दल बोलत होते. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची त्यांची तळमळ शेवटच्या फोन कॉलमध्येही स्पष्ट जाणवत होती.”



