पुणे
Trending

Ajit Pawar : पुतण्याने धरले कान! शरद पवारांच्या निवृत्तीच्या प्रश्नावर अजित पवारांची जाहीर शरणागती

Ajit Pawar On Sharad Pawar : पवार साहेबांच्या निर्णयावर बोलण्याचा मला अधिकार नाही’; महापालिका निवडणुकीच्या रणांगणात ‘दादां’चा बदललेला सूर

पुणे l “शरद पवारांनी आता थांबलं पाहिजे का?” या प्रश्नावर कधीकाळी आक्रमक भूमिका घेणाऱ्या अजित पवारांनी आता चक्क आपले कान पकडून या विषयावर पडदा टाकला आहे. महापालिका निवडणुकीच्या धामधुमीत एबीपी न्यूजशी बोलताना अजित पवार यांनी शरद पवारांच्या निवृत्तीबाबत विचारलेल्या प्रश्नावर अत्यंत नम्रपणे आपली भूमिका मांडली. “तो निर्णय घेण्याचा अधिकार सर्वस्वी त्यांचाच आहे आणि ते जितकी वर्षे या क्षेत्रात राहू इच्छितात, तितकी वर्षे राहू शकतात,” असे म्हणत त्यांनी आपल्या जुन्या विधानावरून माघार घेतली आहे.

काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर अजित पवारांनी 5 जुलै 2023 रोजी झालेल्या पहिल्या सभेत शरद पवारांच्या वयाचा उल्लेख करत, “तुम्ही आता कधी थांबणार आहात की नाही?” असा बोचरा प्रश्न विचारला होता. लालकृष्ण अडवाणी आणि मुरलीमनोहर जोशी यांच्या निवृत्तीचे उदाहरण देत त्यांनी शरद पवारांनी आता मार्गदर्शक म्हणून बाजूला व्हावे, अशी जाहीर मागणी केली होती. मात्र, आज महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने पुण्यात शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा बदलताना दिसत आहेत.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, कालपर्यंत एकमेकांवर टोलेबाजी करणारे ‘घड्याळ’ आणि ‘तुतारी’ हे दोन्ही पक्ष आता हातात हात घालून मैदानात उतरले आहेत. या बदलेल्या राजकीय परिस्थितीचा प्रभाव अजित पवारांच्या वक्तव्यावरही स्पष्टपणे जाणवला. पवारांचे थोरपण सांगताना अजित पवार म्हणाले की, “शरद पवार हे देशातील मोठे नेते आहेत. त्यांचे वय 82-83 असले तरी त्यांचा उत्साह आजही तरुणांना लाजवेल असा आहे. सुप्रियाने दिल्लीत आयोजित केलेल्या कार्यक्रमाला सर्वपक्षीय नेते उपस्थित होते, यावरूनच त्यांच्याबद्दलचा आदर दिसून येतो.”

राजकीय विश्लेषकांच्या मते, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत एकमेकांविरुद्ध लढलेले हे दोन्ही गट महापालिका निवडणुकीसाठी पुन्हा एकत्र आल्याने राज्याच्या राजकारणात ‘पवार फॅमिली’ पुन्हा एक होत असल्याचे चित्र दिसत आहे. शरद पवारांच्या निवृत्तीचा आग्रह धरणारे अजित पवार आता त्यांच्या निर्णयाचा आदर करण्याची भाषा करत आहेत, यामुळे कार्यकर्त्यांमध्येही संभ्रमासह समाधानाचे वातावरण आहे. मतदानापूर्वी अजित पवारांनी घेतलेली ही मवाळ भूमिका निवडणुकीच्या निकालावर काय परिणाम करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0