Ajit Pawar Meet Amit Shah : महायुतीतील जागावाटपावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी घेतली अमित शहांची भेट, मुख्यमंत्रिपदावरून मोठं वक्तव्य केलं.
विधानसभा निवडणुका नोव्हेंबर मध्ये अपेक्षित आहेत. दरम्यान, महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारावरून चुरस सुरू आहे. आज अजित पवार यांनी अमित शहा यांची भेट घेतली.
पुणे :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी झालेल्या भेटीत आगामी विधानसभा निवडणुकीनंतर स्वत:ला मुख्यमंत्री करण्याची मागणी केल्याच्या बातमीचे खंडन केले. बिहारचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून पवारांनी ही मागणी केल्याची चर्चा होती, मात्र त्यांनी ती साफ फेटाळून लावली.
मुख्यमंत्री पदाबाबत अजित पवार काय म्हणाले?
पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले की, “हे पूर्णपणे चुकीचे आहे. अमित शहा गणेश दर्शनासाठी मुंबईत आले होते आणि आम्ही मुख्यमंत्री पदाबाबत कोणतीही चर्चा केली नाही. आमच्या कांदा निर्यात, शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे. अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान आणि किमान आधारभूत किंमत (MSP) सारख्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली आहे.
अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, महायुतीच्या घटकपक्षांमध्ये 288 पैकी काही जागांवर मतैक्य ठरले आहे. इतर जागावाटपावर अजून काही ठरलेले नाही, पण जसे जागावाटप फायनल होईल तशी माहिती मी आपल्याला देईन. पण माझे मत असे आहे की, अशा मैत्रीपूर्ण लढतीना कोणताही अर्थ नसतो. आम्ही आघाडीत असतानाही अशी निवडणूक कधी लढली नाही, असे त्यांनी माध्यमांना म्हटले आहे.
अजित पवार म्हणाले की, मैत्रीपूर्ण लढत होणार आणि त्या सर्व थापा आहेत, असे काहीच होणार नाही. आम्ही सर्व जण बैठक घेऊन 288 जागापैंकी महायुतीमधील कुठल्या कुठल्या पक्षाला द्यायच्या हे काही ठरले आहे, काही बाकी आहे. हे जेव्हा आमचे ठरेल तेव्हा मी यासंदर्भात माहिती देईल. महायुतीच्या योजना लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहचवणे हे आमचे लक्ष आहे, त्यादृष्टीने आम्ही काम करत आहोत.