Pandharpur News : ‘व्हीआयपी दर्शन’वर बंदी; सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांचा कडक इशारा

•Pandharpur Ashadhi Wari VIP Pass : भाविकांचा विजय : सामान्यांची श्रद्धा महत्त्वाची, सत्तेचा दुरुपयोग खपवून घेतला जाणार नाही
पंढरपूर | आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी एक महत्त्वपूर्ण आदेश जारी करत श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरात ‘व्हीआयपी दर्शन’ पास देण्यास सक्त मनाई केली आहे. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला आहे.
या आदेशानंतर मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी, प्रांताधिकारी आणि उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना अधिकृत पत्राद्वारे सूचना पाठवण्यात आल्या आहेत. भाविकांच्या स्वागतार्थ हे धाडसी पाऊल उचलण्यात आले असून, सामान्य श्रद्धाळू वर्गाने या निर्णयाचे स्वागत केले आहे.
दरवर्षी आषाढी एकादशीच्या काळात पंढरपूरात लाखोंच्या संख्येने भाविक दाखल होतात. मात्र या गर्दीत अनेक लोकप्रतिनिधी, मंत्री, खासदार, अधिकारी आणि त्यांचे कार्यकर्ते ‘व्हीआयपी पास’च्या माध्यमातून थेट मंदिरात प्रवेश घेतात, परिणामी सामान्य भाविक तासन्तास दर्शनाच्या रांगेत उभे राहतात. ही अन्यायकारक परिस्थिती आणि त्यातून निर्माण होणारे कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्य सरकारने 2010 मध्येच यात्रा व सण उत्सवांच्या मुख्य दिवशी विशेष दर्शन सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. पण तरीही दबाव, विनंती किंवा ‘ओळखी’च्या आधारे काहीजण प्रवेश मिळवतात. यामुळे वाद निर्माण होतात आणि व्यवस्थेला तडजोड करावी लागते.
जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “गर्दीच्या पार्श्वभूमीवर जर कोणी व्हीआयपी पास देण्याचा प्रयत्न केला, किंवा विनंती मान्य करून नियम मोडले, तर त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला जाईल.”
हा निर्णय सामान्य भक्तांच्या श्रद्धेला न्याय देणारा असून, यात्रा काळात सर्वांसाठी समानता पाळली जावी, या हेतूने शासनाने कठोर भूमिका घेतली आहे.


