
Dhananjay Munde Meet Amit Shah : अटक वॉरंटमुळे कोकाटेंचे मंत्रिपद धोक्यात; मुंडेंच्या दिल्ली दौऱ्याने राजकीय चर्चांना उधाण
नवी दिल्ली | सदनिका घोटाळा प्रकरणात राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात नाशिक न्यायालयाने अटक वॉरंट जारी केल्याने राज्यातील राजकारण तापले आहे. कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार असतानाच, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते धनंजय मुंडे यांनी आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या भेटीमुळे माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेऊन त्यांच्या जागी धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार का? अशा चर्चांना आता उधाण आले आहे.
कोकाटेंच्या अडचणीत वाढ, विरोधकांकडून राजीनाम्याची मागणी
नाशिक जिल्हा न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाची दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवल्याने माणिकराव कोकाटे यांची कोंडी झाली आहे. न्यायालयाने अटक वॉरंट जारी केल्यामुळे त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. नैतिकतेच्या मुद्द्यावर सरकारने कोकाटेंना मंत्रिमंडळातून डच्चू द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
धनंजय मुंडेंची दिल्लीत ‘फिल्डिंग’; मंत्रिमंडळात पुनरागमनाचे संकेत?
एककीकडे कोकाटे कायदेशीर लढाईत अडकले असताना, धनंजय मुंडे यांचा दिल्ली दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. मुंडे यांनी आज संसद भवनात जवळपास एक तास थांबून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत राज्यातील आगामी राजकीय स्थिती आणि मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्याचे समजते. राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे देखील दिल्लीत असल्याने धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळात वापसी निश्चित मानली जात आहे.


