Ajit Pawar: पुण्यासाठी ‘दादांचा वादा’! मेट्रो-PMPML प्रवास मोफत, 500 स्क्वेअर फुटांपर्यंत घरपट्टी माफ; अजित पवारांकडून घोषणांचा पाऊस

Ajit Pawar On Pune BMC Election : पुणे महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे ‘क्रांतिकारी’ हमीपत्र; आरोग्य मदतीत पाच पटीने वाढ, तर कंत्राटदारांना 72 तासांचा अल्टीमेटम
पुणे | पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या Pune BMC Election पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचा संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध केला. “जर पुणेकरांनी राष्ट्रवादीच्या हाती सत्ता दिली, तर आम्ही केवळ आश्वासनं देणार नाही, तर ती पूर्ण करून दाखवू,” असा शब्द अजित पवारांनी दिला आहे. या जाहीरनाम्यात मध्यमवर्गीय, महिला आणि विद्यार्थ्यांसाठी अनेक मोठ्या सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत.
जाहीरनाम्यातील 15 ‘सुपर’ घोषणा:
मोफत प्रवास: पुणेकरांसाठी मेट्रो आणि PMPML बस प्रवास पूर्णपणे मोफत केला जाईल.
मालमत्ता कर माफी: 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना 1 एप्रिल 2026 पासून मालमत्ता कर (Property Tax) पूर्णपणे माफ असेल.
उच्च दाबाने पाणी: प्रत्येक प्रभागात टँकरमुक्त पुणे करण्यासाठी नळाद्वारे उच्च दाबाने दररोज पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन.
खड्डेमुक्त रस्ते: रस्त्यावर खड्डा पडल्यास 72 तासांत कंत्राटदाराच्या खर्चाने दुरुस्ती; अन्यथा कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई आणि काळ्या यादीत समावेश.
आरोग्य मदतीत वाढ: शहरी गरीब आरोग्य योजनेअंतर्गत सामान्य आजारांसाठी 1 ऐवजी 2 लाख आणि दुर्धर आजारांसाठी 2 ऐवजी 5 लाख रुपयांची मदत.
रुग्णालय बेडमध्ये वाढ: वाघोली, हडपसर, वारजे आणि कोंढवा येथे नवीन रुग्णालये उभारून एकूण 2800 बेड उपलब्ध करून देणार.
स्वस्त चाचण्या: MRI, CT स्कॅन यांसारख्या महागड्या चाचण्या अत्यल्प दरात उपलब्ध करून देण्यासाठी PPP मॉडेलवर लॅब उभारणार.
लाडक्या बहिणींना बळ: कौशल्य प्रशिक्षण घेतलेल्या महिलांना स्वयंरोजगारासाठी 5 लाख रुपयांपर्यंत व्याजमुक्त कर्ज.
विद्यार्थ्यांना टॅबलेट: सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांना डेटा प्लॅनसह मोफत टॅबलेट दिले जातील.
स्मार्ट शाळा: महापालिका शाळांचे अद्ययावतीकरण करून तिथे इंग्रजी माध्यमाचे दर्जेदार शिक्षण आणि आधुनिक प्रयोगशाळा सुरू करणार.
स्वच्छ पुणे: 2029 पर्यंत इंदूरला मागे टाकून स्वच्छ सर्वेक्षणात पुण्याचा पहिल्या तीनमध्ये समावेश करण्याचा निर्धार.
रस्त्यांचे जाळे: प्रलंबित असलेल्या 940 कि.मी. लांबीच्या रस्त्यांची कामे कालबद्ध पद्धतीने पूर्ण करणार.
पूर नियंत्रण: पावसात पाणी साचण्याच्या समस्येवर दीर्घकालीन उपाययोजना आणि प्रभावी निचरा प्रणाली राबवणार.
झोपडपट्टी पुनर्वसन: विस्थापनाऐवजी झोपडपट्टीवासीयांच्या हक्कांना प्राधान्य देऊन त्यांच्या पुनर्वसनावर भर देणार.
पारदर्शक कारभार: कोणताही अतिरिक्त कर न लावता महानगरपालिकेचा कारभार पारदर्शक आणि गतिमान करणार.
‘इंदौर’चे स्वप्न आणि ‘मेट्रो’चा शब्द
“पुणे हे विद्येचे माहेरघर आहे, त्याला स्वच्छतेतही देशात अव्वल बनवायचे आहे,” असे अजित पवार म्हणाले. मेट्रो आणि बस प्रवास मोफत करण्याचे आश्वासन ही या निवडणुकीतील सर्वात मोठी ‘गेमचेंजर’ घोषणा मानली जात आहे. यामुळे भाजप आणि इतर प्रतिस्पर्धी पक्षांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.



