Ajit Pawar : अजितदादांचा ‘मोठा दणका’! अमोल मिटकरी आणि रुपाली ठोंबरे-पाटील प्रवक्तेपदावरून हटवले

Ajit Pawar NCP News : वादग्रस्त वक्तव्यांची किंमत मोजावी लागली; रुपाली चाकणकरांवर टीका भोवली; ‘डिमोशन’नंतर रुपाली ठोंबरेंची फेसबुक पोस्ट
मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये मोठा अंतर्गत बदल करण्यात आला आहे. वारंवार वादग्रस्त वक्तव्ये करून पक्षाची कोंडी करणारे पक्षाचे प्रवक्ते अमोल मिटकरी आणि रुपाली ठोंबरे-पाटील यांना नव्या प्रवक्त्यांच्या यादीतून उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांनी वगळले आहे, ज्यामुळे दोघांनाही मोठा दणका बसला आहे.
रुपाली ठोंबरे-पाटील यांना फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्याप्रकरणावरून आपल्याच पक्षाच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या विरोधात रान पेटवणे भोवले आहे. या तिखट टीकेमुळे त्यांना कारणे दाखवा नोटीसही मिळाली होती. रुपाली ठोंबरे यांनी अजित पवारांची भेट घेऊन स्पष्टीकरण दिल्यानंतरही तासाभरातच त्यांची प्रवक्तेपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. दुसरीकडे, भाजपवर वारंवार आक्रमक टीका करून महायुतीमध्ये तणाव निर्माण करणाऱ्या अमोल मिटकरींनाही अजितदादांनी पदावरून पायउतार केले आहे.
या कारवाईच्या अगदी उलट, संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना मारहाण प्रकरणात वादात सापडल्यामुळे प्रवक्तेपद गमावलेले सूरज चव्हाण यांना पुन्हा एकदा प्रदेश प्रवक्त्यांच्या यादीत संधी मिळाली आहे.
रुपाली पाटील ठोंबरे यांनी फेसबुक पोस्टमध्ये नेमके काय म्हटले?
नमस्कार जय महाराष्ट्र…मी आज पुण्याच्या बाहेर आहे,प्रवासात असल्याने माझा संपर्क होऊ शकला नाही. आज पक्षाने नव्याने प्रवक्त्याची नेमणूक केली आहे. त्यात माझ्यासह आमदार अमोल मिटकरी, वैशालीताई नागवडे यांची नावे नाहीत. आम्ही येऊ घातलेल्या निवडणुकांना सामोरे जाणार सज्ज आहोत. पक्षाचे काम जोमाने करणार आहोत.या यादी बद्दल अजित पवारांना भेटून बोलून या विषयी माहिती घेईल मग आपल्या सर्वांशी सविस्तर बोलेल, असं रुपाली पाटील-ठोंबरे म्हणाल्या.


