पुणे

Ajit Pawar : “माळेगाव साखर कारखान्यात अजित पवारांची गोड सत्ता!”

• ब वर्ग गटात 91 मतांनी अजित पवारांची धडाकेबाज बाजी

पुणे, बारामती | बारामतीच्या राजकीय आखाड्यात महत्त्वाची मानली जाणारी माळेगाव सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक रंगतदार झाली असून, मतमोजणीच्या पहिल्याच टप्प्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दमदार विजय मिळवला आहे. ब वर्ग गटातून त्यांनी 91 मते मिळवत निर्णायक आघाडी घेतली, आणि त्यांच्या नेतृत्वाखालील निळकंठेश्वर पॅनेलने पहिला मोर्चा फत्ते केला आहे.

या निवडणुकीसाठी चार प्रबळ पॅनेल्स रिंगणात उतरली होती – अजित पवार यांचे ‘निळकंठेश्वर’, शरद पवार व युगेंद्र पवार यांचे ‘बळीराजा बचाव’, चंद्रराव तावरे यांचे ‘सहकार बचाव’ आणि शेतकरी संघटनांचे ‘कष्टकरी शेतकरी पॅनेल’. यामध्ये ब वर्गातील सहकारी संस्थांनी निर्णायक भूमिका बजावत अजित पवारांकडे स्पष्ट झुकाव दाखवला. 102 पैकी 101 मते वैध ठरली असून यामध्ये 91 मते अजित पवारांच्या पारड्यात पडली.

19,000 हून अधिक मतदारांपैकी तब्बल 88.48% मतदान अ वर्गातून झाले असून, त्यात 12,862 पुरुष व 4,434 महिलांनी सहभाग घेतला. ब वर्गातही 99.02% मतदानाने उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकूण 90 उमेदवारांमधून 21 संचालकांची निवड केली जाणार असून, यासाठी मतमोजणी अजून सुरू आहे.

या पहिल्या यशामुळे अजित पवारांच्या गटात उत्साहाचं वातावरण असून, पुढील निकालांकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. बारामतीच्या राजकारणात माळेगाव कारखान्याचे भवितव्य कोणाच्या हातात जाणार, हे काही तासांत स्पष्ट होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0