Ajit Pawar : अजित पवार यांनी मंत्रालयातील आपत्ती नियंत्रण कक्षातून पुण्याच्या पूर परिस्थितीचा आढावा घेतला
•खासदार सुप्रिया सुळे यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा प्रशासन यांच्या संपर्कात असून परिस्थितीचा आढावा घेत असल्याचे ट्विट केले
मुंबई :- राज्यात पावसाने जोर धरला आहे. अनेक शहरांमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पुण्यामध्ये पावसाने जोरदार बॅटिंग चालू असून पुण्याच्या अनेक भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही सोसायटीमध्ये आणि घरामध्ये पाणी शिरले आहे. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील आपत्ती नियंत्रण कक्षातून परिस्थितीचा आढावा घेतला आहे. तर खासदार सुप्रिया सुळे यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा प्रशासन यांच्यासोबत सातत्याने संपर्कात असून वेळोवेळी परिस्थितीचा आढावा घेतल्या जात आहे. पुणे शहरात जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व शाळा महाविद्यालय तसेच कंपन्यांना सुट्ट्या जाहीर केले आहे.
तसेच आपत्तीग्रस्त नागरिकांच्या निवारा व अन्नधान्याची सोय केली जात आहे असे सांगत नागरिकांनीही अतिवृष्टी व पुरापासून बचावासाठी आवश्यक काळजी घेण्याचे व आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ नजीकच्या प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधण्याचे तसेच महत्त्वाच्या कारणांशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच कार्यकर्त्यांनीही नागरिकांना सक्रिय मदत करावी, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की,पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आज सकाळीच जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरणाचे प्रमुख सुहास दिवसे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून जिल्ह्यातील पूरपरिस्थिती तसेच बचाव व मदतकार्याच्या तयारीचा आढावा घेतला. खडकवासला तसेच जिल्ह्याच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस होत असल्याने जिल्हा प्रशासन तसेच आपत्ती निवारण यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे. गरज पडताच नागरिकांना तात्काळ मदत पोहोचवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांना दिले. पुणे शहर, पिंपरी चिंचवडसह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांनीही पावसाचा जोर कमी होईपर्यंत आवश्यक ती काळजी घेण्याचे व आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ नजीकच्या प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधावा तसेच महत्त्वाच्या कारणांशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, असे माझे आवाहन आहे.
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की,
पुणे आणि परिसरात पाऊस सुरू आहे. यामुळे शहराचा बहुतांश भागात रस्त्यांवर पाणी साठले आहे . याखेरीज काही सोसायट्या आणि घरांमध्ये पाणी शिरले आहे. पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. याबाबत मी स्वतः जिल्हाधिकारी,पुणे आणि जिल्हा प्रशासन यांच्या संपर्कात असून परिस्थितीचा आढावा घेत आहे. ज्या नागरीकांना मदतीची गरज आहे तिथं प्रशासकीय यंत्रणेसह आम्ही सर्वजण उपलब्ध आहोत. नागरीकांना देखील विनंती आहे की,अत्यंत महत्वाचे व गरजेचे असेल तरच घराबाहेर पडावे, काळजी घ्या.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हणाले की, बचाव कार्य सुरू असून गरज पडल्यास हेलिकॉप्टरची मदत देण्याचे प्रशासन सांगितले आहे. सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी, लोकांनी घाबरण्याचे कारण नाही. सर्व अधिकाऱ्यांना फिल्डवर उतरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना लवकरच दिलासा मिळेल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. पुण्याचे जिल्हाधिकारी, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त, एनडीआरएफ आणि लष्कराचे कर्नल यांच्याशी मी बोललो आहे. तसेच याआधीच त्यांनी एनडीआरफच्या बोटी वैगरे रवाना केल्या आहेत. लष्कर देखील आता पुण्यात पोहचते आहे. तसेच वेळ पडल्यास बचावकार्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेतली जाईल, असे शिंदे म्हणाले आहेत.