Ajit Pawar : बाबा आढाव यांच्या उपोषणा स्थळी अजित पवार!, अजित पवारांनी ईव्हीएम वर मांडली आपली भूमिका
Ajit Pawar Meets Baba Adhav : 94 वर्षीय सामाजिक ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी ईव्हीएम विरोधात पुकारले आंदोलन
पुणे :- लोकसभेच्या निवडणुकीनंतर जारी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला मोठ्या प्रमाणावर यश आले आहे. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीने एकूण जागेपैकी 80 टक्के जागेवर कब्जा केल्याने विरोधकांनी ईव्हीएम मध्ये काहीतरी गडबड असल्याचा दावा केल्याने राजकीय वादाला तोंड फुटले आहे.असं असतानाच अनेक ठिकाणी ईव्हीएममध्ये काहीतरी गडबड झाल्याचा आरोप करत 94 वर्षीय बाबा आढाव उपोषणाला बसले आहेत. ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याने महायुतीचा विजय झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव Baba Adhav यांनी पुण्याच्या फुले वाड्यात आंदोलन सुरू केलंय. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांची भेट घेतली.
अजित पवार नेमकं काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री म्हणाले, “लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या 31 जागा निवडून आल्या होत्या. आमच्या केवळ 17 जागा आल्या. आम्ही तो पराभव मान्य केला. कारण तो जनतेचा कौल होता. परंतु, तेव्हा कोणीच ईव्हीएम वरून प्रश्न उपस्थित केले नाहीत. माझ्या बारामती विधानसभा मतदारसंघात माझा उमेदवार 48 हजार मतांनी पराभूत झाला. मात्र मी त्याच मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत एक लाखाहून अधिक मताधिक्याने निवडून आलो आहे. कारण बारामतीच्या जनतेचं पहिल्यापासून ठरलेलं आहे की लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा. त्यानुसारच ते मतदान करतात. लोकसभा निवडणुकीत ज्या गावांमधून आम्हाला मतदान मिळालं नाही, तिथं मला विधानसभेच्या वेळी भरभरून मतदान मिळालं आहे. आता पाच महिन्यांत जनतेचा कौल बदलला याला आम्ही काय करणार.”.
अजित पवार म्हणाले, “मला बाबा आढाव यांना सांगायचं आहे की काही गोष्टी या निवडणूक आयोगाशी संबंधित असतात. निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. काही गोष्टी सर्वोच्च न्यायालयाच्या अखत्यारित आहेत. त्यात आम्हाला ढवळाढवळ करता येत नाही. त्यांना जे योग्य वाटतं, ते निर्णय त्यांनी दिले आहेत. मी स्वतः बारामतीचा उमेदवार होतो. मी पाहिलं आहे की संध्याकाळी साडेपाच वाजल्यानंतर मतदारांची गर्दी वाढली होती.
कोण आहेत बाबा आढाव?
डॉ. बाबा आढाव हे पुणे महापालिकेचे 1970 च्या दशकात नगरसेवक राहिलेत. ते समाजवादी पक्षाचे सदस्य होते. रिक्षा पंचायतीचे नेते म्हणूनही त्यांनी काम केलंय. एक गाव एक पाणवठा ही मोहिम त्यांनी सुरु केली होती. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते म्हणून आता त्यांची ओळख आहे. सध्या ते 94 वर्षांचे आहेत.