Ajit Pawar : अजितदादांनंतर आता सुनेत्रा पवारांकडेच राष्ट्रवादीचे सारथ्य? 15 दिवसांत होणार राष्ट्रीय अध्यक्षांची निवड; पक्षाच्या विलीनीकरणापूर्वीची मोठी राजकीय खेळी!

Pune NCP Latest News : पुणे सर्किट हाऊसमध्ये राजकीय खलबतं; सुनेत्रा पवारांच्या समर्थनासाठी आमदार-खासदार एकवटले; पार्थ आणि जय पवारही ॲक्शन मोडमध्ये
पुणे | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या अध्यक्षपदावर कोणाची वर्णी लागणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, येत्या १५ दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांची अधिकृत निवड होणार असून, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे.
पुणे सर्किट हाऊसवर राजकीय हालचाली
पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज सकाळपासूनच पुण्यातील सर्किट हाऊस येथे ठाण मांडून आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या विजयानंतर नवनिर्वाचित सदस्यांच्या भेटीगाठींचा ओघ सुरू आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रवादीचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांचे बंधू, तसेच अजितदादांचे पुत्र पार्थ पवार आणि जय पवार हे देखील यावेळी उपस्थित असल्याने या भेटीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
सुनेत्रा पवारच का?
अजित पवारांच्या निधनानंतर पक्षाची विस्कळीत झालेली घडी पुन्हा बसवण्यासाठी सुनेत्रा पवार हाच एकमेव सर्वमान्य चेहरा असल्याचे पक्षातील वरिष्ठ नेत्यांचे मत आहे.
आमदार-खासदारांचा पाठिंबा: पक्षातील बहुतांश लोकप्रतिनिधींनी सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे.अजितदादांच्या कामाचा वारसा पुढे नेण्यासाठी सुनेत्रा पवार या सक्षम असून, त्यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये आधीच उत्साह आहे.
विलीनीकरणाची चर्चा कार्यकारिणीनंतर?
सध्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. मात्र, राष्ट्रवादीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आधी राष्ट्रीय कार्यकारिणीची निवडणूक होऊन नवीन अध्यक्षांची निवड केली जाईल. त्यानंतरच शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीसोबतच्या विलीनीकरणासंदर्भात पुढची कायदेशीर आणि राजकीय प्रक्रिया राबवली जाईल.



