मुंबईठाणे
Trending

Maharashtra Agriculture Minister Manikrao Kokate : ‘रमी’ खेळत कृषी मंत्री! – चित्रफीत व्हायरल, राजीनाम्याची मागणी तीव्र

Maharashtra Agriculture Minister Manikrao Kokate : शेतकऱ्यांच्या आक्रोशाऐवजी रमीमध्ये व्यस्त मंत्री, विरोधकांचा संताप

मुंबई | राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे Maharashtra Agriculture Minister Manikrao Kokate यांच्यावरील वादांच्या मालिकेत आणखी एका प्रकरणाची भर पडली आहे. विधानभवनात सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनादरम्यान मंत्री कोकाटे मोबाईलवर ‘रमी’ पत्त्यांचा खेळ खेळताना दिसत असल्याची एक चित्रफीत राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर रविवारी पोस्ट केल्यानंतर राज्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे. विरोधकांनी कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली असून, सत्ताधाऱ्यांवर शेतकऱ्यांविषयीच्या असंवेदनशीलतेबाबत तीव्र शब्दांत टीकास्त्र सोडलं आहे.

“शेतकऱ्यांना विसरा… खेळा रमी!”

चित्रफीत प्रसारित करताना रोहित पवार यांनी म्हटले की, “सरकार आणि मंत्री दिशाहीन झाले असून, पीकविमा, कर्जमाफी, भावांतर यांसारख्या ज्वलंत प्रश्नांवर दुर्लक्ष करून, मंत्र्यांना विधानभवनात रमी खेळण्याची फुरसत आहे.”
त्याचबरोबर शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या मंत्र्यांच्या हकालपट्टी यादीत कोकाटे यांचे नाव असल्याचा दावा करत खळबळ उडवली.
“शेतकऱ्यांनो विसरा हमी, खेळा रमी!” अशी उपरोधिक टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली. माजी खासदार राजू शेट्टी यांनी “दिवसाला आठ शेतकरी आत्महत्या करत असताना यांना लाज कशी वाटत नाही?” असा सवाल उपस्थित केला.
तर बच्चू कडू यांनी “ही त्यांची आठवी-नववी चूक आहे, आणखी काय अपेक्षा ठेवायची?” अशी बोचरी टिप्पणी केली. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही सरकारवर शेतकऱ्यांविषयी बेफिकिरीचा आरोप करत ‘आता शेतकऱ्यांनीच धडा शिकवावा’ असे आवाहन केले.

कोकाटेंचा बचाव : “खेळ खेळत नव्हतो, बंद करत होतो”

या वादावर खुद्द माणिकराव कोकाटे यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना स्पष्टीकरण दिलं. “मी रमी खेळत नव्हतो, मोबाईलवर आलेला खेळ बंद करत होतो. विधान परिषदेचं काम यूट्यूबवर पाहण्यासाठी मोबाईल सुरू केला होता. त्यावेळी आलेल्या जाहिरातीत ‘रमी’ खेळ डाऊनलोड झाला होता,” असं त्यांनी सांगितलं.
तसंच, “रोहित पवार यांनी चित्रफीत अर्धवट दाखवली. पुढचा भाग दाखवलेलाच नाही. विरोधकांकडे मुद्दे नसल्याने ते अशा पद्धतीचे रिकामटेकडे उद्योग करत आहेत,” असा आरोपही त्यांनी केला.

विरोधकांची मागणी तीव्र – सरकारची परीक्षा?

या प्रकरणावरून आता विरोधकांनी कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी अधिक तीव्र केली आहे. चित्रफीत आणि वक्तव्ये यामुळे मंत्रिमंडळात संतापाची लाट असून भाजपच्या अंतर्गत चर्चेतही कोकाटेंच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त होत असल्याची माहिती पुढे येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0