Aaditya Thackeray : मुंबईतील ‘कचरा कर’वर आदित्य ठाकरे संतापले, ‘खड्डेमुक्त करण्याचे आश्वासन दिले, पण…’
•मुंबईतील प्रस्तावित कचरा कराला आदित्य ठाकरे यांनी कडाडून विरोध करत हा कर सामान्य जनतेवर टाकला आहे. या कराविरोधात मुंबईकरांनी आवाज उठवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
मुंबई :- शिवसेना (ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी काल (1 एप्रिल) मुंबईतील मातोश्री येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी महायुती सरकारच्या धोरणांवर टीका केली. त्यांनी विशेषतः नवीन “कचरा कर” ला विरोध केला आणि त्याचा सामान्य नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार असल्याचे म्हटले.या करामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होणार असून सरकारने या निर्णयाचा फेरविचार करावा, असे ते म्हणाले.
आदित्य ठाकरे म्हणाले की, जगभरात एप्रिल फूल डे साजरा केला जातो, मात्र ते ‘अच्छे दिन सरकार’ म्हणून साजरा झाला पाहिजे. निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने स्थापन झालेल्या महायुती सरकारला ‘एप्रिल फूल’ सरकार म्हणत त्यांनी एकही आश्वासन पूर्ण केले नसल्याचा आरोप केला.‘घनकचरा कर’ या नावाने लादल्या जाणाऱ्या या नव्या ‘अदानी टॅक्स’ला मुंबईकरांनी कडाडून विरोध करण्याचे आवाहन त्यांनी केले.
मुंबईची लोकसंख्या वाढत असताना घनकचऱ्याचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे कचरा व्यवस्थापनाचा खर्चही वाढला असून, त्याचा थेट परिणाम मुंबईकरांवर होणार आहे.यावर आक्षेप घेत आदित्य ठाकरे म्हणाले की, सरकारचे धोरण कर माफ करण्याचे नसून सर्वसामान्य नागरिकांकडून अधिक कर वसूल करण्याचे आहे.
ते म्हणाले की, सध्याच्या सरकारने मुंबई खड्डेमुक्त करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र निवडणुकीपूर्वी केवळ भूमिपूजन झाले, अद्याप काम सुरू झालेले नाही. रस्तेबांधणीचे काम किती झाले, त्याचा दर्जा किती, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.मुंबईत पाण्याची समस्या वाढत असताना सरकार कंत्राटदारांचे खिसे भरत असल्याचा आरोपही त्यांनी केला.


