Abu Azami : संभाजी महाराज त्यांच्यासाठी…’, औरंगजेबाचे कौतुक करणारे अबू आझमी आता छत्रपतींबद्दल काय म्हणाले?

Abu Azami News : समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी आता छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे.
मुंबई :- समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी मुघल शासक औरंगजेबाचे कौतुक केल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. वाद वाढत गेल्याने त्यांना विधानसभेतून निलंबितही करण्यात आले. दरम्यान, आता अबू आझमी यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे.
अबू आझमी यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर ट्विट केले आहे,स्वराज्याचे दुसरे छत्रपती, शूर योद्धा, धर्मगुरू छत्रपती संभाजी महाराज यांना त्यांच्या पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन.
याआधी अबू आझमी यांनी औरंगजेबला एक चांगला राजा म्हणून सांगितल्याने महाराष्ट्रात मोठा राजकीय खळबळ उडाली आहे. आझमी यांच्या विधानावर भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) जोरदार टीका केली आणि त्यांच्यावर संभाजी महाराजांचा अपमान केल्याचा आरोप केला.
काय म्हणाले अबू आझमी?
सपा नेते अबू आझमी म्हणाले होते की, मी औरंगजेबला क्रूर शासक मानत नाही. त्या काळातील सत्तासंघर्ष राजकीय होते, धार्मिक नव्हते. औरंगजेबाच्या सैन्यात अनेक हिंदू होते, त्याचप्रमाणे छत्रपती शिवरायांच्या सैन्यात अनेक मुस्लिम होते. औरंगजेब हा क्रूर शासक नव्हता त्याने अनेक मंदिरे बांधली.छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यात हिंदू-मुस्लीम लढाई झाली असे म्हणणारे खोटे बोलत आहेत.
या वादानंतर अबू आझमी यांनी आपल्या वक्तव्यावर माफीही मागितली आहे. अबू आझमी यांनी स्पष्टीकरण देत म्हटले की, मी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांविरोधात बोलण्याचा विचारही करू शकत नाही.माझ्या शब्दांचा विपर्यास करण्यात आला आहे. औरंगजेब रहमतुल्ला अलीह बद्दल जे इतिहासकार आणि लेखक म्हणतात तेच मी बोललो आहे.