
Prithviraj Chavan : ‘भगव्या’चा अपमान सहन करणार नाही, युवासेनेचा ठाण्यात रस्त्यावर उतरून निषेध
ठाणे :- मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या निकालावर प्रतिक्रिया देताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राजकीय वातावरण तापले आहे. ‘भगवा दहशतवाद’ हा शब्द वापरू नये, त्याऐवजी ‘हिंदुत्ववादी दहशतवाद’ किंवा ‘सनातनी दहशतवाद’ म्हणा, असे चव्हाण यांनी म्हटले होते. त्यांच्या या विधानाचा निषेध करण्यासाठी युवासेनेने आज ठाण्यात आंदोलन करत तीव्र संताप व्यक्त केला.
शनिवारी युवासेनेचे कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यातील आनंद आश्रम येथे हे आंदोलन करण्यात आले. यावेळी युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी “भगवा आमचा मान, सन्मान आणि अभिमान आहे. त्याचा अपमान आम्ही कधीही खपवून घेणार नाही,” असा इशारा दिला.



चव्हाण यांचे नेमके विधान काय?
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता झाल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी तपास यंत्रणेवर अपयशाचा ठपका ठेवला. त्याचवेळी त्यांनी ‘भगवा दहशतवाद’ या शब्दावर आक्षेप घेतला. ते म्हणाले, “माझी हात जोडून विनंती आहे, ‘भगवा दहशतवाद’ हा शब्द वापरू नका. भगवा रंग हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या झेंड्याचा आणि वारकऱ्यांच्या झेंड्याचा रंग आहे. त्यामुळे त्याला दहशतवादाशी जोडू नका. त्याऐवजी ‘हिंदुत्ववादी दहशतवाद’ किंवा ‘सनातनी दहशतवाद’ असे म्हणा.”
त्यांच्या या विधानामुळे भाजपनेही त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. युवासेनेच्या या आंदोलनात ठाणे लोकसभा अध्यक्ष विराज निकम, ठाणे शहर विधानसभा अध्यक्ष जितेश गुप्ता यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. यामुळे येत्या काळात या मुद्द्यावरून राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे.


