Thane Crime News : ठाणे पोलिसांची धडक कारवाई! 4 देशी बनावटीची पिस्तूलं आणि जिवंत काडतुसांसह मध्य प्रदेशातील तस्कर जेरबंद

•अंमली पदार्थ विरोधी पथकाचा भिवंडीत सापळा; 4 लाखांहून अधिक किमतीचा शस्त्रसाठा हस्तगत
ठाणे | ठाणे पोलीस आयुक्तांनी अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांविरुद्ध पुकारलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश आले आहे. गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने भिवंडी तालुक्यातील वेहळे-भाटाळे परिसरात सापळा रचून मध्य प्रदेशातून आलेल्या एका तस्कराला 4 देशी बनावटीची पिस्तूलं आणि 4 जिवंत काडतुसांसह अटक केली आहे. जप्त करण्यात आलेल्या या शस्त्रास्त्रांची किंमत 4 लाख 8 हजार रुपये इतकी आहे.
गोपनीय माहितीवरून पोलिसांची चपळाई
अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस हवालदार अमोल देसाई यांना एक तरुण बेकायदेशीर शस्त्रांची विक्री करण्यासाठी भिवंडी परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीची वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांनी गांभीर्याने दखल घेत पथकाला कारवाईचे आदेश दिले. 2 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी च्या सुमारास माणकोली नाक्याकडून डोंबिवली बायपासकडे जाणाऱ्या रस्त्यावरील जय बारकुला देव चौकात पोलिसांनी सापळा लावला.
20 वर्षीय आरोपीला मध्यप्रदेशातून अटक
संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या सोहील बेग शोराब बेग मिर्झा (वय 20 ) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. सोहील हा मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्याचा रहिवासी आहे. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे विनापरवाना 4 देशी बनावटीची पिस्तूलं आणि जिवंत काडतुसे मिळून आली. पोलिसांनी तातडीने हा शस्त्रसाठा जप्त करून आरोपीला बेड्या ठोकल्या.
शस्त्रांचा वापर नेमका कशासाठी?
या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीला 9 फेब्रुवारी 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. हा शस्त्रसाठा मध्य प्रदेशातून कोणी पाठवला? मुंबई-ठाणे परिसरात तो कोणाला विकला जाणार होता? किंवा या शस्त्रांचा वापर एखाद्या मोठ्या गुन्ह्यासाठी केला जाणार होता का? या दिशेने पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र निकम पुढील तपास करत आहेत.
या पथकाची उल्लेखनीय कामगिरी
पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अमरसिंह जाधव आणि सहायक पोलीस आयुक्त रवींद्र दौंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कर्णवर पाटील, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र निकम, अमोल देसाई आणि त्यांच्या पथकाने ही धाडसी कामगिरी केली आहे.


