Aaditya Thackeray : शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर
•आदित्य ठाकरे यांनी घेतली नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट, तातडीने पंचनामा करून आवश्यक ती मदत जाहीर करावी
छत्रपती संभाजीनगर :- शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्याचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्यासोबत छत्रपती संभाजी नगर मधील पैठण तालुक्यातील पाचोड येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या बांधावर भेट दिली. तसेच शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी अशी मागणी ही आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
पश्चिम महाराष्ट्र सह मराठवाड्यात मागील चार ते पाच दिवसांपासून मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच ऐन सणासुदीच्या काळातच शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसल्याने शेतकऱ्यांना अस्मानी संकटांना तोंड द्यावे लागत आहे. अशा परिस्थितीत राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्या भागाचे पाहणी केली आहे.
आदित्य ठाकरे काय म्हणाले?
शासनाने प्रशासनाकडून तातडीने पंचनामा करून लवकरात लवकर मदत जाहीर करणे अत्यंत आवश्यक आहे. गद्दार सरकारने शेतकरी बांधवांच्या झालेल्या नुकसानीमध्ये कसलीही राजकारण न करता सरसकट नुकसान भरपाई द्यावी तसेच या कठीण प्रसंगी शिवसेना शेतकरी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचे ग्वाही शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.