Aaditya Thackeray : पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्यास आदित्य ठाकरेंचा तीव्र विरोध; बीसीसीआयवर साधला निशाणा

‘पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही’, पंतप्रधानांच्या विधानाचा संदर्भ देत आदित्य ठाकरेंनी उपस्थित केले सवाल
मुंबई :- आशिया चषकात पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्याच्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) भूमिकेवर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. त्यांनी थेट केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांना पत्र लिहून बीसीसीआयच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दहशतवाद आणि राष्ट्रीय हितसंबंधांसारख्या गंभीर मुद्द्यांवर बीसीसीआयने घेतलेल्या भूमिकेवर त्यांनी जोरदार टीका केली आहे.
पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून ‘पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही’ असे म्हटले असतानाही, बीसीसीआय पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्यासाठी संघ पाठवत आहे. यावर आदित्य ठाकरेंनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “बीसीसीआय राष्ट्रीय हितापेक्षा आणि आपल्या जवानांच्या बलिदानापेक्षा वर आहे का?” असा सवाल त्यांनी पत्राद्वारे उपस्थित केला आहे.
आमदार आदित्य ठाकरेंच्या पत्रात काय?
“गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या देशातील नागरिक आणि सैन्याने पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ले वारंवार सहन केले आहेत. यासंदर्भात केंद्र सरकारने आपली भूमिका नेहमीच ठामपणे मांडली आहे.नुकतेच, माननीय पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून सांगितले आहे की, आता पाणी आणि रक्त दोन्ही एकत्र वाहू शकत नाहीत. तरीही, दुर्दैवाने आणि निर्लज्जपणे, बीसीसीआय (BCCI) आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानसोबत खेळण्यासाठी एक संघ पाठवत आहे. बीसीसीआयचे हे पाऊल राष्ट्रीय हितासाठी योग्य आहे का? हे पहलगाममध्ये हल्ल्यात शहीद झालेल्या आपल्या जवानांच्या बलिदानापेक्षा मोठे आहे का?
गेल्या अनेक वर्षांत, अनेक खेळाडू मानवाधिकारांचा भंग होत असल्याच्या कारणावरून आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळण्यास नकार देत आहेत. दहशतवाद हे असेच एक कारण आहे जे शांततेने प्रगती होऊ देत नाही. तरीही, केवळ बीसीसीआयच्या हट्टामुळे, पैशाच्या लोभापायी, आपल्या जवानांच्या बलिदानाला कमी लेखले जात आहे. आम्ही जगभरातील देशांमध्ये शिष्टमंडळे पाठवून पाकिस्तानची दहशतवादी बाजू उघड करत आहोत. आता आपण त्यांच्यासोबत क्रिकेट खेळत असल्याबद्दल जगभरात आपली बाजू कशी योग्य ठरवणार?
पाकिस्तानने भारतातील खेळाडूंना वारंवार धमक्या दिलेल्या असताना, बीसीसीआयने केवळ स्वतःच्या फायद्यासाठी पाकिस्तानसोबत सामने खेळणे ही एक लाजिरवाणी गोष्ट आहे. मला आशा आहे की, जरी आपण राजकारणात वेगवेगळ्या बाजूने असलो तरी, या विचारावर आपण एकत्र येऊ. ज्याप्रमाणे आम्ही ‘ऑपरेशन सिंदूर’ साठी आपल्या माननीय पंतप्रधानांना पाठिंबा दिला होता, त्याचप्रमाणे आपण या प्रश्नावरही एकत्रितपणे पुढे जाऊ”, असे आदित्य ठाकरेंनी या पत्रात नमूद केले आहे.


