Vasai Crime News : तळेगावच्या घरफोड्यांची वसईत ‘वारी’! 6 लाखांच्या चोरीचा छडा लावत सराईत गुन्हेगारांच्या टोळीला ठोकल्या बेड्या

Vasai Police Latest News : पुणे, पिंपरी-चिंचवड ते मुंबईपर्यंत गुन्ह्यांचे जाळे; वालीव पोलिसांनी तळेगावातून खेचून आणले आरोपी
वसई/वालीव | वसईच्या वालीव परिसरात घरफोडी करून 6 लाखांहून अधिक मुद्देमाल लंपास करणाऱ्या टोळीचा वालीव पोलिसांनी शिताफीने छडा लावला आहे. तळेगाव (पुणे) परिसरातून या टोळीच्या म्होरक्यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून वालीवसह पुणे आणि वडगाव मावळ येथील वाहन चोरीच्या गुन्ह्यांचीही उकल करण्यात आली आहे.
फणसपाड्यात भरदिवसा 6 लाखांची घरफोडी फिर्यादी रतनलाल प्रजापती यांच्या फणसपाडा येथील घरात नोव्हेंबर महिन्यात ही घरफोडी झाली होती. अज्ञात चोरट्यांनी घराचा कडी-कोयंडा तोडून घरातील सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण 6 लाख 13 हजार 750 रुपयांचा ऐवज लंपास केला होता. या घटनेमुळे वालीव परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.
पुण्यातील तळेगावात रचला सापळा
वाहन चोरी आणि घरफोडीच्या वाढत्या घटना लक्षात घेऊन पोलीस उप-आयुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी यांनी विशेष आदेश दिले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप घुगे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वासराव बाबर यांच्या पथकाने तांत्रिक तपास केला असता, आरोपी हे पुणे जिल्ह्यातील तळेगाव भागात असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तातडीने तळेगाव एमआयडीसी परिसरात सापळा रचला आणि शंभू ऊर्फ प्रभू विनोद भोसले (23 वय) व नवीन गिरीश तिवारी (29 वय) या दोन मुख्य आरोपींना जेरबंद केले. त्यांचा तिसरा साथीदार गणेश गायकवाड याला वसई पूर्व परिसरातून ताब्यात घेण्यात आले.
तळेगाव, वडगाव आणि वसईतील 3 गुन्हे उघड आरोपींची सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून तळेगाव आणि मावळ परिसरातून चोरी केलेल्या 2 मोटारसायकली, घरफोडीत चोरलेले मोबाईल फोन आणि गुन्ह्यात वापरलेली हत्यारे असा एकूण 1 लाख 21 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे वालीव, तळेगाव दाभाडे आणि वडगाव मावळ पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक अशा एकूण तीन गुन्ह्यांची यशस्वी उकल झाली आहे.
रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार जेरबंद या टोळीचा म्होरक्या शंभू भोसले याच्यावर मुंबईतील ट्रॉम्बे आणि पुण्यातील हडपसर, भोसरी पोलीस ठाण्यात यापूर्वीच 7 गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर त्याचा साथीदार गणेश गायकवाड याच्यावर वाकड, हिंजवडी आणि निगडी पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे नोंद आहेत.
या पथकाने केली कामगिरी ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस उप-आयुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी, सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वासराव बाबर, सहाय्यक फौजदार शैलेश पाटील, किरण म्हात्रे, आनंद मोरे, बाळू कुटे आणि पथकाने पार पाडली.


