‘अर्थ’पूर्ण पर्वाचा करुण अंत! बॅ. शेषराव वानखेडेंचा विक्रम मोडण्यापूर्वीच अजितदादांची ‘एक्झिट’; 15 अर्थसंकल्पांचे स्वप्न ठरले अधुरे

•11 वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा ‘हिमालयीन’ विक्रम; आर्थिक शिस्त आणि ‘लाडकी बहीण’ योजनेचे जनक अनंतात विलीन
मुंबई | महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार हे केवळ ‘दादा’ नव्हते, तर ते राज्याच्या तिजोरीचे सर्वात विश्वासू रखवालदार होते. बुधवारी झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात त्यांचे निधन झाले आणि त्याचबरोबर राज्याच्या अर्थसंकल्पीय इतिहासात एक नवा विक्रम प्रस्थापित होण्यापूर्वीच हे पर्व संपुष्टात आले.
बॅ. शेषराव वानखेडेंचा विक्रम मोडण्याच्या उंबरठ्यावर…
राज्याच्या इतिहासात सर्वाधिक 13 वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा मान विदर्भातील बॅ. शेषराव वानखेडे यांच्याकडे आहे. अजित पवार यांनी 2025-26 चा अर्थसंकल्प सादर करून हा आकडा 11 वर नेला होता. महायुती सरकारच्या सध्याच्या कार्यकाळात 2029 पर्यंत त्यांना आणखी 4 अर्थसंकल्प सादर करण्याची संधी होती. जर काळाने त्यांच्यावर झडप घातली नसती, तर 15 वेळा अर्थसंकल्प मांडून ते राज्याच्या इतिहासातील सर्वात यशस्वी अर्थमंत्री ठरले असते.
पाच वर्षांत तीन वेळा शपथ आणि आर्थिक शिस्त
अजित पवार यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक अजब विक्रम केले:
उपमुख्यमंत्रीपदाचा षटकार: राज्याचे तब्बल सहा वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा बहुमान त्यांना मिळाला.
अजब योग: पाच वर्षांच्या कालावधीत तीन वेळा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे ते एकमेव नेते ठरले.
विक्रमी अर्थसंकल्प: 2025-26 मध्ये त्यांनी सादर केलेला अर्थसंकल्प 7 लाख कोटी रुपयांहून अधिक रकमेचा होता.
गुलाबी क्रांती आणि ‘लाडकी बहीण’ योजना
अजितदादांच्या अर्थमंत्रीपदाच्या कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’. 2024-25 च्या अर्थसंकल्पात त्यांनी ही योजना जाहीर केली आणि तिथूनच राष्ट्रवादी काँग्रेसचा रंग ‘गुलाबी’ झाला. कोविड-19 च्या काळात जेव्हा राज्यांच्या अर्थव्यवस्था कोलमडल्या होत्या, तेव्हा अजित पवारांनी राखलेली आर्थिक शिस्त आणि 3 टक्क्यांखाली ठेवलेली राजकोषीय तूट, याचे कौतुक खुद्द ‘कॅग’नेही केले होते.


