Sanjay Raut : मोदींनी संविधानाला नमन करणे हे एक ढोंग… खासदार संजय राऊत
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते खासदार Sanjay Raut यांची मोदींवर तसेच शहावर टीका
मुंबई :- संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्यांना जनतेने झिडकारले आहे. तसेच सात ते आठ जागांवर जोरजबरदस्ती करण्यात आली आणि त्या जागा महायुतीने जिंकल्या. मात्र याचा वचपा विधानसभेत काढला जाईल असे विधान ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केले आहे. यावेळी त्यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणाऱ्या नरेंद्र मोदी आणि भाजपा नेते अमित शहा यांच्यावर सडकून टीका केली.
संविधानाला नमन करणे हे एक ढोंग दिल्लीमध्ये शुक्रवारी एनडीएची बैठक झाली. यामध्ये नरेंद्र मोदींनी संविधानाला नमन केले. यावरून संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. ते म्हणाले, “मोदींनी संविधानाला नमन करणे हे एक ढोंग आहे. संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्यांना जनतेने झिडकारले आहे. त्यानंतर संविधानाची प्रत ही मस्तकी लावण्याची सुबुद्धी सुचली त्याबद्दल आभार मानतो”, असा टोला राऊतांनी लगावला.
विधानसभेला वचपा काढला जाईल पुढे राऊतांनी भाजपने दहशतीने 9 जागा मिळवल्या असा गंभीर आरोप केला आहे. हा आरोप करत त्यांनी इशारा दिला आहे. “महाविकास आघाडीला महाराष्ट्रात यश मिळाले आहे. 30 जागांवर जिंकणे हे मोठे यश आहे. किमान सात ते आठ जागा या जोर जबरदस्ती, पैशाची दहशत, प्रशासनावर दबाव, चोऱ्यामाऱ्या, लबाडी करून मिळवण्यात आल्या. त्यात अमोल किर्तीकर यांचे एक उदाहरण आहे. आता विधानसभेला याचा वचपा काढला जाईल” असा इशारा राऊतांनी दिला आहे.
तसेच पुढे नरेंद्र मोदी यांचे सरकार टिकणार नाही असा दावा केला आहे. “सरकार स्थापनेपासून घोटाळा सुरू आणि मोदी देशस्थापनेच्या गप्पा मारत आहेत. तिसरी टर्म देशसेवेसाठी… तिसरी टर्म कॉर्पोरेट आणि व्यापाऱ्यांच्या सेवेसाठी… हे आता स्पष्ट झाले आहे. अजुनही नरेंद्र मोदी बेरोजगारी, महागाई, चीनची घुसखोरी असे अनेक प्रश्न आहेत त्यावर बोलले नाहीत. अमित शहा आणि नरेंद्र मोदी शेअर बाजारावर बोलत आहेत. हे सरकार टिकणार नाही. म्हणूनच जोपर्यंत सरकार आहे तोपर्यंत शेअर बाजार आपल्या ताब्यात ठेवायचा. उद्योगपतींचा फायदा करून घ्यायचा आणि लाखो कोटींचा देशाला चुना लावायचा हे त्यांचे धोरण आहे”, असा हल्ला राऊतांनी केला आहे.