पुणे
Trending

अजित पवार अपघात: “विमान 50 फूट खाली कोसळून खाक झालं होतं!”; युगेंद्र पवारांचा डोळे पाणावणारा खुलासा, व्हीएसआर विरुद्ध आता बारामतीत ठिय्या

Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात | रोहित पवारांनंतर युगेंद्र पवारांचाही आक्रमक पवित्रा | मुंबईत नकार मिळाल्यावर आता बारामती पोलीस ठाण्यात धाव

बारामती :- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाचे गूढ उकलण्यासाठी आता त्यांचे दोन्ही पुतणे रोहित पवार आणि युगेंद्र पवार एकत्र आले आहेत. “अपघाताची बातमी मिळताच मी धावत बारामती विमानतळावर पोहोचलो, पण तिथे जे दृश्य पाहिलं ते काळजाचा थरकाप उडवणारं होतं,” अशा शब्दांत युगेंद्र पवार यांनी आपली व्यथा मांडली. या प्रकरणातील दोषींवर गुन्हा दाखल करण्यासाठी आज दोन्ही नेते बारामती पोलीस ठाण्यात धडक देणार आहेत.

युगेंद्र पवारांनी सांगितला ‘तो’ थरार

अपघाताबद्दल बोलताना युगेंद्र पवार यांनी प्रत्यक्ष घटनास्थळाचे वर्णन केले. ते म्हणाले, “मी विमानतळावर पोहोचलो तेव्हा तिथे सुरुवातीला कोणीच नव्हते. मी माझी गाडी थेट रनवे क्रमांक 11 कडे नेली. तिथे 50 फूट अंतरावर दादांचे विमान कोसळलेले होते. विमान अक्षरशः जळून खाक झाले होते. ते भीषण दृश्य पाहिल्यावर लक्षात आले की हा अपघात किती भयानक होता. रोहित पवारांनी काल मुंबईत एफआयआर (FIR) दाखल करण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी टाळाटाळ केली. आता आम्ही बारामतीतच गुन्हा दाखल करण्यासाठी कायदेशीर लढा देणार आहोत.”

व्हीएसआर कंपनी आणि ‘तो’ संशयास्पद फोन कॉल

या प्रकरणात उच्च न्यायालयात दाखल झालेल्या एका जनहित याचिकेने संशयाची सुई अधिक गडद केली आहे. आरटीआय कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी दाखल केलेल्या याचिकेत असा दावा करण्यात आला आहे की, अजित पवार मूळतः गाडीने प्रवास करणार होते. मात्र, एका खासदाराने त्यांना फोन करून ‘व्हीएसआर’च्या विमानाने जाण्यास भाग पाडले. विशेष म्हणजे, ज्या व्हीएसआर कंपनीचे विमान या अपघातात कोसळले, त्या कंपनीवर युरोपमध्ये आधीच सुरक्षिततेच्या कारणावरून बंदी घालण्यात आली आहे, असा दावाही याचिकेत करण्यात आला आहे.

आता लढा बारामतीत

बुधवारी मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात रोहित पवार आणि पोलिसांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. पोलिसांनी तांत्रिक कारणास्तव गुन्हा दाखल करण्यास नकार दिला. त्यामुळे आज रोहित पवार आणि युगेंद्र पवार आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह बारामती तालुका पोलीस ठाण्यात दाखल होणार आहेत. “जोपर्यंत एफआयआर दाखल होत नाही, तोपर्यंत आम्ही हटणार नाही,” असा आक्रमक पवित्रा दोन्ही नेत्यांनी घेतला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0