
Rahul Gandhi Present In Mulund Court : आरएसएस मानहानी प्रकरणाची सुनावणी; मुलुंड चेक नाक्यावर कार्यकर्त्यांकडून काळे झेंडे दाखवत निषेध
मुंबई/भिवंडी | लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज मुंबई दौऱ्यावर असून सकाळी 9 वाजून 15 मिनिटांच्या सुमारास त्यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले आहे. त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते विमानतळावर दाखल झाले असून विमानतळ परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. राहुल गांधी सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी भिवंडी सत्र न्यायालयात हजर होणार असून, 2014 मधील एका वादग्रस्त विधानावरून सुरू असलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्यात ते नवीन जामीनदार सादर करणार आहेत.
हे संपूर्ण प्रकरण 2014 मधील लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराशी संबंधित आहे. भिवंडीतील एका सभेत बोलताना राहुल गांधी यांनी महात्मा गांधी यांच्या हत्येमागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात असल्याचा आरोप केला होता. या विधानामुळे संघाची बदनामी झाल्याचा दावा करत आरएसएसचे कार्यकर्ते राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात मानहानीची याचिका दाखल केली होती. या खटल्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील-चाकूरकर हे राहुल गांधींचे जामीनदार होते. मात्र, गेल्या वर्षी चाकूरकर यांचे निधन झाल्यामुळे न्यायालयाच्या नियमानुसार राहुल गांधी यांना नवीन जामीनदार द्यावा लागणार आहे. आज न्यायालयात ते स्वतः हजर राहून ही प्रक्रिया पूर्ण करतील. सुरक्षिततेच्या कारणास्तव जामीनदाराचे नाव अद्याप गुप्त ठेवण्यात आले असून, राहुल गांधी कुणाला जामीनदार म्हणून सादर करतात, याची मोठी उत्सुकता राजकीय वर्तुळात निर्माण झाली आहे.
राहुल गांधींचा हा दौरा केवळ न्यायालयीन प्रक्रियेपुरता मर्यादित नसून त्याला राजकीय संघर्षाचीही धार लागली आहे. मुंबईत येत असताना मुलुंड चेक नाक्यावर काही अज्ञात कार्यकर्त्यांनी राहुल गांधींना काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध केला. यावेळी पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत काळे झेंडे दाखवणाऱ्या आंदोलकांची धरपकड केली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. भिवंडी महापालिकेच्या महापौर पदाची निवडणूक आणि राज्यातील बदललेली राजकीय समीकरणे या पार्श्वभूमीवर राहुल गांधी आज माध्यमांशी बोलताना काय भूमिका मांडतात, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.



