•Sharad Pawar Called Dilip Walse Patil अजित पवार गटाचे आमदार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना गंभीर दुखापत
मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील हे त्यांच्या राहत्या घरात पाय घसरून पडले होते. त्यामुळे दिलीप वळसे पाटील यांच्या खुब्याला मार लागला होता. तसेच त्यांचा हात फॅक्चर झाला होता. त्यानंतर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दिलीप वळसे पाटील यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांनी दिलीप वळसे पाटील यांच्याशी फोनवर संवाद साधून प्रकृतीची विचारपूस केली.
27 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास घडला होता अपघात
काही दिवसांपूर्वीच दिलीप वळसे पाटील हे त्यांच्या राहत्या घरात पाय घसरून पडले होते. त्यामुळे दिलीप वळसे पाटील यांच्या खुब्याला मार लागला होता. तर त्यांचा हात देखील फॅक्चर झाला होता. 27 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास हा अपघात घडला होता. यासंबंधीची माहिती त्यांनी स्वतःच सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती. त्यानंतर त्यांच्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये फूट पडल्यानंतर दिलीप वळसे पाटील हे अजित पवार यांच्यासोबत सरकारमध्ये सामील झाले आहेत. तेव्हापासून शरद पवार आणि दिलीप वळसे पाटील यांच्यात अबोला दिसून येत होता. मात्र, दिलीप वळसे पाटील यांना दुखापत झाली असून ते रुग्णालयामध्ये उपचार घेत असल्याची माहिती मिळाल्यानंतर शरद पवार यांनी स्वतः दिलीप वळसे पाटील यांना फोन करत त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. दिलीप वळसे पाटील हे शरद पवार यांचे मानसपुत्र असल्याचे पूर्वी म्हटले जात होते. त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे.