Amruta Fadnavis : अमृता फडणवीस यांचा बँकिंग क्षेत्राला निरोप! 23 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर ॲक्सिस बँकेचा सोडला ‘वरिष्ठ उपाध्यक्ष’ पद

•मॅनेजमेंट ट्रेनी ते वरिष्ठ उपाध्यक्ष असा थक्क करणारा प्रवास; ‘एका सुंदर अध्यायाचा अंत’ म्हणत ट्विटरवर केली भावनिक पोस्ट
मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी बँकिंग क्षेत्रातील आपल्या 23 वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीला पूर्णविराम दिला आहे. ॲक्सिस बँकेत ‘वरिष्ठ उपाध्यक्ष’ (Senior Vice President) या जबाबदार पदावर कार्यरत असलेल्या अमृता फडणवीस यांनी आज आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती देत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
23 वर्षांचा यशस्वी प्रवास
अमृता फडणवीस यांनी 23 वर्षांपूर्वी एक सामान्य ‘मॅनेजमेंट ट्रेनी’ (व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी) म्हणून ॲक्सिस बँकेत आपल्या कामाला सुरुवात केली होती. आपल्या कामाच्या जोरावर त्यांनी बँकेत विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. या दोन दशकांहून अधिक काळामध्ये त्यांनी,
शाखा संचालन (Branch Operations)
कॉर्पोरेट बँकिंग
ट्रेझरी (Treasury)
ग्राहक संबंध (Customer Relations)
अशा अनेक विभागांचे नेतृत्व केले आणि अखेर वरिष्ठ उपाध्यक्ष पदापर्यंत मजल मारली.
“ही संस्था माझं दुसरं घर राहिली”; भावनिक ट्विट
आपल्या निवृत्तीची घोषणा करताना अमृता फडणवीस यांनी ट्विटरवर एक अत्यंत भावूक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी म्हटले की, “आज मी कृतज्ञतेने भरलेल्या अंतःकरणाने वरिष्ठ उपाध्यक्ष पदावरून निवृत्त होत आहे. हा काळ माझ्यासाठी खूप काही शिकवणारा होता. ही संस्था माझे कुटुंब, शिक्षक आणि दुसरे घर राहिली आहे.”
सहकाऱ्यांचे मानले आभार
अमृता फडणवीस यांनी आपल्या प्रवासात साथ देणाऱ्या सहकाऱ्यांचे आणि बँकेच्या नेतृत्वाचेही आभार मानले आहेत. त्यांनी बँकेचे एमडी आणि सीईओ अमिताभ चौधरी यांच्या पाठिंब्याचा विशेष उल्लेख केला. “हा एक सुंदर अध्याय इथे संपत असला, तरी मी इथून घेतलेले आयुष्यभराचे धडे आणि कमावलेली मैत्री कायम सोबत ठेवणार आहे,” असेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले.



