Amit Thackeray : “म्युझिकल रोडवर ‘जय हो’ कशासाठी? मराठी मातीतलं गाणं का नाही?”; कोस्टल रोडच्या प्रयोगावरून अमित ठाकरेंनी सरकारला झापले!

Amit Thackeray On Musical Road : मुंबईकरांची ही ‘बेसिक’ मागणी होती का?; कोस्टल रोडवरील प्रयोगावर मनसेचा तीव्र आक्षेप; “मराठी अस्मितेचा विचार सरकारला स्वतःहून का सुचत नाही?”
मुंबई | मुंबईतील महत्त्वाकांक्षी कोस्टल रोडवर वाहने चालवताना ठराविक वेग राखल्यास रस्त्यावरून संगीताची धून ऐकू येते. या आगळ्यावेगळ्या प्रयोगाची सध्या चर्चा सुरू असतानाच, मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सरकार आणि प्रशासनावर टीकेची झोड उठवली आहे. या प्रयोगासाठी वापरण्यात आलेल्या गाण्यावरून आणि मुंबईकरांच्या गरजांवरून त्यांनी अनेक रोखठोक प्रश्न विचारले आहेत.
‘जय हो’च का? मराठी संस्कृतीचा विसर पडला का?
अमित ठाकरे यांनी सर्वात महत्त्वाचा प्रश्न गाण्याच्या निवडीवर उपस्थित केला आहे. “कोस्टल रोड हा मुंबईत आहे, महाराष्ट्रात आहे. मग तिथे आपल्या मराठी मातीतलं गाणं का वाजवलं जात नाही?” असा सवाल त्यांनी केला. ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ सारखे राज्यगीत किंवा लता मंगेशकर यांच्या आवाजातील गाणी निवडली असती तर प्रत्येक मराठी माणसाचा अभिमान वाढला असता, असे मत त्यांनी व्यक्त केले. “आपल्या अस्मितेची आठवण वारंवार सरकारला मनसेलाच का करून द्यावी लागते?” असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना लगावला.
मुंबईकरांची ही गरज आहे का?
मुंबईत रस्त्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित असताना अशा प्रयोगांचा अट्टाहास का? असा प्रश्न विचारत अमित ठाकरे म्हणाले की, “ही मुंबईकरांची ‘बेसिक’ मागणी तरी होती का?” रोजच्या ट्रॅफिकच्या गोंगाटातून शांतता मिळावी म्हणून लोक कोस्टल रोडचा वापर करतात, अशावेळी हे संगीत प्रवाशांसाठी ‘गोंगाट’ ठरणार नाही का, अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली.
सुरक्षिततेचा मुद्दा
संगीताच्या धूनमुळे गाडी चालवताना चालकाचे लक्ष विचलित होऊन अपघात होण्याची शक्यता प्रशासनाने तपासली आहे का? असा गंभीर तांत्रिक मुद्दाही अमित ठाकरेंनी मांडला आहे. कुतूहल म्हणून काही दिवस हे ठीक वाटेल, पण कायमस्वरूपी हा प्रयोग डोकेदुखी ठरू शकतो, असा इशारा त्यांनी दिला.
संस्कृतीविना विकास अपूर्ण!
“विकास आणि नवीन प्रयोग जरूर करा, पण ही कोणाची भूमी आहे आणि इथली संस्कृती काय आहे, याचे भान राखा,” असा सल्ला त्यांनी सरकारला दिला. आपल्या मातीचा सूर न उमटणारा विकास हा अपूर्ण असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.


