Thane ACB Trap News : घरपट्टी नावावर करण्यासाठी 3 हजारांची मागणी; शहापूरचा ग्रामसेवक लाचलुचपतच्या जाळ्यात! ठाणे ACB ची धडाकेबाज कारवाई

Thane Shahpur Latest Bribe Case : पत्नीच्या नावावर घरपट्टी करण्यासाठी मागितली होती लाच; तडजोडीअंती 3000 रुपये ठरले; शहापूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल
ठाणे, शहापूर | ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील आसनगाव ग्रामपंचायत हद्दीत घरपट्टी हस्तांतरणाच्या कामासाठी लाचेची मागणी करणाऱ्या एका ग्रामसेवकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) गुन्हा दाखल केला आहे. हिरामण मधू तरवारे (46 वय) असे या ग्रामपंचायत अधिकाऱ्याचे नाव असून, तो सध्या साकडबाव आणि आसनगाव या दोन्ही ग्रामपंचायतींचा कारभार पाहत होता. Thane Latest ACB Bribe Case
नेमके प्रकरण काय?
तक्रारदाराच्या पत्नीने आसनगाव ग्रामपंचायत हद्दीत एक घर विकत घेतले होते. या घराची घरपट्टी पत्नीच्या नावावर करण्यासाठी तक्रारदाराने ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज केला होता. हे काम करून देण्यासाठी ग्रामसेवक हिरामण तरवारे याने 5,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने 29 ऑक्टोबर 2025 रोजी ठाणे एसीबीकडे यासंदर्भात तक्रार नोंदवली होती.
एसीबीची पडताळणी आणि कारवाई
तक्रार प्राप्त झाल्यानंतर एसीबीच्या पथकाने पंचांच्या उपस्थितीत पडताळणी केली. या पडताळणी दरम्यान, ग्रामसेवक तरवारे याने मूळ 5,000 रुपयांच्या मागणीवर तडजोड केली आणि 3,500 रुपये लाच मागितली. अखेर 3,000 रुपये स्वीकारण्याचे त्याने कबूल केले. कायदेशीर मोबदल्याव्यतिरिक्त स्वतःच्या फायद्यासाठी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने, गुरुवारी रात्री उशिरा (12 फेब्रुवारी 2026) शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
मार्गदर्शक अधिकारी
ही कारवाई पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सुहास शिंदे आणि भागवत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे


